कोल्हापूर : कर्नाटकमधून गांजा विक्रीसाठी कोल्हापूरमध्ये आलेल्या रेकॉर्डवरील उच्चशिक्षित गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिये-कसबा बावडा रोडवर सापळा रचत संबंधित तरुणास ताब्यात घेतले. नईम अब्बास खोजा (वय 31, मूळ रा. सतीशनगर गोकाक, जि. बेळगाव, सध्या रा. शिवाजी पार्क झोपडपट्टी, कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून 1 किलो 800 ग्रॅम गांजासह 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
खोजा रेकॉर्डवरील गुन्हेगार
पोलिसांनी खोजा याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोल्हापूरमध्ये गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच खोजा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच बेळगांवमध्येही त्याच्यावर एक गुन्हा नोंद आहे.
प्रेमभंग झाला अन् गांजा विक्रीत उतरला
खोजा याचा प्रेमभंग झाल्याने तो सुरुवातीच्या काळात गांजा सेवनाच्या आहारी गेला. गांजा सेवन करता तो गांजाची विक्रीही करू लागला. गांजा विक्रीतून जास्त पैसे मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी येऊ लागला. यापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.