कोल्हापूर

कोल्हापूर: धामणी प्रकल्पातील भूसुरुंगामुळे भिंतींना तडे, पाण्याचे स्त्रोत आटले

अविनाश सुतार

कौलव: पुढारी वृत्तसेवा : राई (ता. राधानगरी) येथील धामणी मध्यम प्रकल्पाचे कामासाठी वापरल्या जाणाऱ्या भूसुरुंगाच्या स्फोटामुळे चौके व मांडवकरवाडी येथील काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे झरे कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदार असलेल्या श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कंपनीकडे तक्रार केली आहे.

याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धामणी प्रकल्पाच्या कामासाठी भुसुरुंगाचा वारेमाप वापर केला जात आहे. सुरूंगाच्या स्फोटामुळे मानबेट, चौके, राई, कंदलगाव, मांडवकरवाडी येथील डोंगर रांगातील झर्‍यांतून येणारे पिण्याच्या पाण्याचे स्रोत बंद झाले आहेत. तसेच विहिरीचे पाणी सुध्दा पूर्णतः आटले आहे. त्यामुळे गावांमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कंपनी आहे.

भूसुरूंगातून उडणारी धूळ आजूबाजूच्या शेत जमिनी व जनावरांच्या चार्‍यावर चिकटल्यामुळे जनावरे आजारी पडत आहेत. भूसुरुंगाचा आवाज व क्षमता कमी करावी. अथवा पर्याय मार्ग म्हणून ब्रेकरचा वापर करावा. तसेच मानबेट या गावाला जाणार्‍या रस्त्यामध्ये खडी व डंपर मधून माती पडल्यामुळे मानबेट मार्गावरील एसटी बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. तरी भू सुरुंगाचे स्फोट थांबवून अन्य मार्गानी दगड फोडावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रचंड मोठ्या स्फोटामुळे चौके व मांडवकरवाडीतील अनेक घरांना तडे जाऊन भिंतींचे नुकसान झाले आहे. हा विभाग अतिवृष्टीचा आहे. त्यामुळे पावसाळयात या घरांची पडझड होण्याचा मोठा धोका आहे.

अतितीव्रतेच्या भुसुरुंगाच्या स्फोटाने नैसर्गिक जलस्त्रोत आटले असून ऐन उन्हाळ्यात लोकांना तीव्र पाणीटंचाई भासणार आहे. स्फोटाची तीव्रता कमी करण्याची सुचना देऊन हे काम थांबवले आहे. मांडवकरवाडी व चौके येथे तडे गेलेल्या घरांची नुकसान भरपाई संबंधित कंपनीने दयावी. – संभाजी कांबळे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मानबेट

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT