Keshavrao Natyagruha | केशवराव नाट्यगृहाच्या भिंतींचे तडे कायम! 
कोल्हापूर

Keshavrao Natyagruha | केशवराव नाट्यगृहाच्या भिंतींचे तडे कायम!

सात कोटींचे ‘रिस्टोरेशन’ कागदावरच?; बिल अदा; पण कामावर प्रश्नचिन्ह : नाट्यप्रेमीतून संताप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू असतानाच रिस्टोरेशनच्या कामातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. ज्या पाठीमागील भिंतीला आगीमुळे सर्वाधिक फटका बसला होता, त्याच भिंतीवरील तडे आजही कायम असून काही ठिकाणी ते अधिक रुंदावल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भिंतींच्या रिस्टोरेशनचे काम पूर्ण झाल्याचे दाखवत सुमारे सात कोटी रुपयांचे बिलही संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. त्यामुळे 'काम न करता बिलाचा मलिदा कोणाच्या आशीर्वादाने' असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

दोन वर्षांपूर्वी भीषण आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर हे ऐतिहासिक नाट्यगृह पूर्ववत उभारण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात रिस्टोरेशन आणि छत उभारणीचे काम पूर्ण झाल्याचा दावा करत महापालिकेकडून संपूर्ण बिल उचलले; मात्र पाठीमागील भिंतीवरील तडे अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी भेगा अधिक रुंदावत असल्याने रिस्टोरेशनच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सल्लागार संस्थेने आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही या गंभीर त्रुटीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. दोष स्पष्टपणे दिसत असतानाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणित करून बिल कसे अदा करण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

तडे लपवले की दुर्लक्ष झाले?

रिस्टोरेशनच्या कामामध्ये भिंतीचे रिस्टोरेशन आणि छताची पुनर्उभारणी याचा समावेश होता. त्यावरच सात कोटींचा निधी दिला होता; पण मूळ कामच केले नसल्याचे समोर येत असून तडे लपवले की दुर्लक्ष झाले, याचे स्पष्टीकरण सल्लागार कंपनी, ठेकेदार कंपनीने करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT