कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या विविध कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करत रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध कामे करण्यात आली आहेत.
प्रारंभी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके, आ. राहुल आवाडे, आ. अशोकराव माने, आ. शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपमहापौर अक्षय जरग, समित कदम, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, जिल्हा बँकचे संचालक बाबासाहेब पाटील, विजयसिंह माने, भाजपा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) नाथाजी पाटील, वैद्यकीय शिक्षणचे प्रधान सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षणचे आयुक्त अनिल भंडारी, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, डॉ. अजित लोकरे, डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. अनिता परितेकर, डॉ. गिरीष कांबळे, डॉ. राहुल बडे, डॉ. अभिजित ढवळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शुभम हिरेमठ यांनी केले.
सीपीआरच्या ऐतिहासिक वाटचालीसह नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांची माहिती मान्यवरांना चित्रफितीतून दाखविण्यात आली. यातून सीपीआरचा इतिहास उलगडला गेला.
नूतनीकरणात याचा समावेश
नूतनीकरणाच्या कामांत रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान, मॉड्युलर बर्न आयसीयू, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर आयसीयू, एमआरआय विभाग, अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेड यांचा समावेश आहे. विविध वैद्यकीय विभागांचेही आधुनिकीकरण करण्यात आले आहे.