कोल्हापूर : सीपीआर परिसरात पार्किंगचा अक्षरश: बट्ट्याबोळ उडाला आहे. याचा थेट परिणाम भाऊसिंगजी रोडवर होत आहे. यामुळे होणार्या वाहतूक कोंडीने सीपीआर चौक ते छत्रपती शिवाजी चौक या दोन-तीन मिनिटांच्या अंतरासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागत आहे. या मार्गावर सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडी होत असल्याने भाऊसिंगजी रोडचा श्वास कोंडत आहे. गुरुवारी तर सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यातून वाहनांना वाट करून देताना शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांची दमछाक झाली.
सीपीआरमध्ये दररोज सकाळच्या सत्रात वाहनांची प्रचंड गर्दी होते. सध्या सीपीआरमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर झाल्याने वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वगळता रुग्णांचे नातेवाईक, अन्य नागरिकांची वाहने सीपीआर परिसरात सोडली जात नाहीत. वाहने सोडण्यासाठी वाहनधारक प्रवेशद्वारावरच थांबतात, यामुळे प्रवेशद्वारावर वाहतुकीची कोंडी होते आणि त्याचे रूपांतर अगदी सीपीआर चौकातील सिग्नल, तसेच भाऊसिंगजी रोडवर टाऊनहॉलपर्यंत कोंडीत होते. या कोंडीचा त्या पुढील वाहतुकीवर परिणाम होत जातो. यामुळे अनेकदा एका बाजूला थेट छत्रपती शिवाजी चौकापर्यंत वाहतूक संथ होते. दुसर्या बाजूला सीपीआर चौकातील वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा परिणाम दसरा चौक, सिद्धार्थनगर आदीपर्यंत होतो.
सीपीआर आवारात जागेचा तुटवडा आहे. मात्र, ज्या पद्धतीने सीपीआरच्या आवारात अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. यामुळे त्याचा सीपीआरमधील वाहतुकीलाही फटका बसतो आणि त्याचा परिणाम भाऊसिंगजी रोडवरही होता. त्यामुळे सीपीआरच्या जागेचे पार्किंगसाठी अभ्यास करून योग्य नियोजन व्हायला हवे; अन्यथा दररोज वाहतुकीच्या कोंडीचा कोल्हापूरकरांना फटका सहन करावा लागणार आहे.
भाऊसिंगजी रोडवर असणारा बस थांबा, रिक्षा थांबा, फेरीवाले आणि दुचाकी, रिक्षांचे पार्किंग यासह सीपीआरसमोरच टाऊन हॉल उद्यान ते न्यायालय इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून खासगी रुग्णवाहिकांनी पार्किंगचा अड्डाच केला आहे. हे पार्किंग वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या रोडवरून करवीर पंचायत समिती, सीपीआर, महापालिका यासह शासकीय कार्यालये आणि कोकणातून शहरात येणार्या शेकडो वाहनांची वर्दळ आहे.
या रोडवर पार्किंगला आणि वाहतुकीला शिस्त नसल्याने वाहतुकीची कोंडी कामय आहे. चौकातील सिग्नलपासूनच कोंडीला सुरुवात होते. सकाळी 9 ते दुपारी 2 आणि दुपारी 4 ते रात्री साडेआठ या वेळेत प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. सीपीआर पश्चिमेकडील प्रवेशद्वारावरच केएमटी थांबा, रिक्षा थांबा आहे. खासगी रुग्णवाहिकांनी तर येथे दुतर्फा पार्किंगचा अड्डाच केला आहे. त्यासोबतच विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, टपर्या यामुळेही कोंडीत भर पडत आहे.
सीपीआरमध्ये रुग्णवाहिकांना ये-जा करताना बेशिस्त पार्किंगचा फटका बसतो. त्यामुळे कोंडीतून दाटीवाटीने त्यांना मार्ग काढावा लागतो. सिग्नल सुटला की, वाहतूक कोंडीमुळे तारांबळच उडते. रुग्णवाहिकेला रुग्णालयात जाण्यासाठी अनेकदा जागा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असते.