कोल्हापूर : सीपीआरमधील कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिले मंजुरीसाठी होणार्या आर्थिक देवघेवीच्या रजिस्टरमधील घोटाळा शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिला होता. याची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. सोमवारी समितीच्या वतीने ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांसमक्ष पंचनामा करुन संबंधित रजिस्टर ताब्यात घेण्यात आले. येत्या आठ दिवसांत चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप माने यांनी दिली.
सोमवारी डॉ. माने यांच्यासह चौकशी समिती सदस्यांनी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील सदस्य संजय पवार, विजय देवणे यांच्यासमोर पंचनामा करून आर्थिक देवघेवीचे रजिस्टर चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचार्यांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात उपस्थित राहण्याचे पत्र देऊनदेखील कार्यालयातील कर्मचारी कारंडे हा अनुपस्थित असल्याने संजय पवार आणि विजय देवणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन वाडीकर यांना जाब विचारला. वरिष्ठ अधिकार्यांनी सूचना देऊनही कर्मचारी उपस्थित का नाही, अशी विचारणा केली.