कोल्हापूर

‘सीपीआर’ने मागविले पिण्याचे पाणी विकत

Arun Patil

कोल्हापूर : बालिंगा उपसा केंद्राकडे रॉ वॉटर घेऊन जाणार्‍या दगडी चॅनेलची पडझड झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 'सीपीआर' तहानले आहे. स्वतः सीपीआर प्रशासन विकत पाणी टँकर मागवून रुग्णांसह नातेवाईकांची तहान भागवत आहेत. स्वच्छतेसाठी सीपीआरमधील बोअरच्या पाण्याचा वापर केला जात आहे.

महापालिका टँकद्वारे शहरातील प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करत आहे, पण त्यांना सीपीआरचा विसर पडला आहे. रुग्णांसह नातेवाईक पाण्यासाठी तहानले आहेत. पाण्याअभावी टाक्या कोरड्या पडल्याने सीपीआरने दोन बोअर सुरू केले आहेत. त्या पाण्याचा वापर प्रत्येक वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी केला आहे. मुलांसह मुलींच्या वसतिगृहात देखील पाणीटंचाई असल्याने येथे टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

सीपीआर मुख्य इमारतीसमोर, अधिष्ठाता कार्यालयाबाहेर, वेदगंगा-दूधगंगा इमारतीबाहेर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. दूधगंगा-वेदगंगा इमारतीच्या मध्ये, नर्सिंग कॉलेजबाहेर, वसतिगृहांसह प्रत्येक इमारतींवर स्वच्छतेसाठी पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांवर महापालिकेकडून येणारे पाणी विद्युत पंपाद्वारे चढविले जाते. पण पाणी टंचाईमुळे टाक्या कोरड्या पडल्याने बोर चालू करून टाक्या भरल्या जात आहेत. तर सीपीआरच्या पिण्याच्या पाण्याचा महापालिकेला विसर पडल्याने सीपीआरने विकत पाण्याचे टँकर मागविले आहेत.

SCROLL FOR NEXT