कोल्हापूर

किल्ले विशाळगडावर गायीच्या वासराचा बिबट्याने पाडला फडशा

अमृता चौगुले

विशाळगड, पुढारी वृत्‍तसेवा : किल्ले विशाळगडावर गायीच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याने गडावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि८) रोजी पहाटे घडली. सकाळी ९ वाजता ग्रामस्थांना याबाबत माहिती मिळाली. बिबट्याचे सतत दर्शन ग्रामस्थांना होत असून बिबट्या बिनधास्त वावरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, विशाळगड येथील शुक्रवारी (दि ८) रोजी पहाटे रियाज गफ्फुर बारगीर यांच्या मालकीच्या गायीच्या वासराचा फडशा शिवकालीन मार्गावरील सिमेंट पायऱ्या नजीकच्या जागेत पाडला. जानेवारी महिन्यातही रियाज बारगीर यांचा रेडा बिबट्याने फस्त केला होता. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाला पोलीस पाटील उदय जंगम यांनी ही माहिती कळवूनही दिवसभर वनविभागाचे कर्मचारी इकडे फिरकलेच नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, गडावर भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर पैकी शिंपीपेठ येथे दि २५ ऑगस्ट रोजी बिबट्याने एका गायीचा रस्त्यालगत फडशा पाडला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी गजापूर पैकी वाणीपेठ, मुसलमानवाडी, दिवाणबाग, बौद्धवाडी या परिसरातही बिबट्याच्या हल्ल्यात सात गायीं, एक गाढव आणि रेडकू बिबट्याने फस्त केले आहे. तो आता भरवस्तीत घुसू लागल्याचे चित्र आहे. भीतीपोटी रात्रीच्यावेळी बाहेर जायला गडावासीय तसेच परिसरातील शेतकरी घाबरू लागले आहेत. बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT