कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे बालरोग विभागाच्या डोक्यावर कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आला होता. यामुळे बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. दै. ‘पुढारी’ने दि. 13 जून रोजी ‘बालरोग विभागाच्या डोक्यावर कोरोना वॉर्ड...’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने एका दिवसात कोरोना वॉर्डचे दगडी इमारतीमधील लोअर कोरोना कक्षात स्थलांतर केले आहे.
कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था न करता बालरोग विभागाच्या अगदी वरच्या मजल्यावर कोरोना रुग्ण ठेवण्याचा अजब आणि निष्काळजीपणाचा निर्णय सीपीआर प्रशासनाने घेतला होता. बालकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. अशा परिस्थितीत त्याच इमारतीत कोरोना रुग्ण ठेवल्यास संसर्गाचा धोका अधिक वाढतो. दै. ‘पुढारी’ने यावर ठोस आणि तथ्यपूर्ण वृत्त प्रसिद्ध केले होते. याचे पडसाद उच्चस्तरीय आरोग्य यंत्रणेपर्यंत उमटले. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत कोरोना वार्ड दुसर्या इमारतीत सुरक्षित व स्वतंत्र वॉर्डमध्ये हलविला आहे. येथे चार व्हेंटिलेटर, आठ ऑक्सिजन बेडसह औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवला आहे.
यामुळे आता कोरोना रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार होतील आणि बालरुग्ण विभागात येणार्या नवजात व बालकांच्या आरोग्याला कोणताही धोका राहणार नाही. कोरोना रुग्ण ठेवलेल्या बालरोग विभागातील वॉर्डचे सॅनिटायझिंग करून स्वच्छता करण्यात आली आहे. सध्या सीपीआरच्या कोरोना वॉर्डात तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.