COVID Lockdown Impact | कोरोना काळातील लॉकडाऊनचा कर्करोग निदानावर घाला! 
कोल्हापूर

COVID Lockdown Impact | कोरोना काळातील लॉकडाऊनचा कर्करोग निदानावर घाला!

सात विकसित देशांत तब्बल ५५ हजार कर्करोग रुग्ण निदानाविना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना महामारीतील लॉकडाऊन काळात रुग्णांवर प्रयोगशील औषधांचा वापर करण्यात आला. याची मोठी किंमत जगातील आरोग्य व्यवस्थेला मोजावी लागली. कोरोनावरील औषधांच्या वापराने नागरिकांना काही नवे आजार जडल्याचे चित्र असतानाच कोरोनाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये अनिर्बंध लॉकडाऊनमुळे सात विकसित देशांमध्ये सुमारे ५५ हजार कर्करोग रुग्णांचे निदानच झाले नाही, असा धक्कादायक निष्कर्ष आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आला आहे.

निदान कमीच...

कोरोना काळात सर्वाधिक फटका प्रोस्टेट कर्करोगाच्या निदानाला बसला. या निदानांमध्ये अपेक्षित पातळीच्या तुलनेत २४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. त्याखालोखाल महिलांमधील स्तनाचा कर्करोग आणि त्वचेचा गंभीर प्रकार मानल्या जाणाऱ्या मेलानोमा यांच्या निदानांमध्ये प्रत्येकी १८ टक्क्यांची घट झाली. याउलट फुफ्फुस आणि अंडाशयाच्या कर्करोगांच्या निदानांवर तुलनेने कमी परिणाम झाल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

अमेरिकेत १७ हजार मृत्यू

यापूर्वी ‌‘जामा ऑन्कोलॉजी‌’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेत कोरोना काळात कर्करोग उपचारांमध्ये झालेल्या व्यत्ययांमुळे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत निदानानंतरच्या पहिल्या वर्षात सुमारे १७,३९० अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

भारतातील रुग्णांचे काय

विकसित देशांमध्ये झालेला हा अभ्यास पाहता भारतासारख्या देशामध्ये किती रुग्ण कर्करोगाच्या निदानापासून दूर राहिले याची मोजदाद झाली नसली, तरी ही संख्या चिंताजनक असू शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

१६ टक्के प्रकरणांची नोंदच नाही

फ्रान्समधील लिऑन येथे कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) या संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, आयर्लंड, न्यूझीलंड, नॉर्वे आणि ब्रिटन या देशांमध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत अपेक्षित असलेल्या कर्करोग निदानांपैकी जवळपास १६ टक्के प्रकरणे नोंदलीच गेली नाहीत. याविषयी २६ लाख रुग्णांच्या माहितीवर आधारित व्यापक अभ्यास ‌‘द लॅन्सेट ऑन्कोलॉजी‌’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात सोमवारी हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासानुसार, हजारो नागरिकांना कर्करोगाची लक्षणे असतानाही त्यांचे वेळेत निदान झाले नाही किंवा ते उपचार व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परिणामी, रुग्णांचे आजार पुढील टप्प्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT