कोल्हापूर : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करावी, या मागणीसाठी न्यायालयीन संघटनांनी मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ९०० कर्मचारी सहभागी होणार आहेत. जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयातील लिपीक, स्टेनो, बेलिफ, शिपाई कामकाजापासून अलिप्त राहणार आहेत.
मागणीसाठी दोन महिन्यांपासून कर्मचारी विविध मार्गांनी आंदोलन करत आहेत. याचा पुढचा टप्पा म्हणून कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. याच धर्तीवर सुधारित वेतन श्रेणीचा प्रस्ताव २०२५ मध्ये शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ३४ हजार कर्मचारी संपात
राज्यव्यापी बंदमध्ये राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे राज्यभरातील न्यायालयीन कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक राज्यव्यापी संघटनेच्या वतीने दिली आहे.