कोल्हापूर : तुम्ही डॉक्टर व्हावे म्हणून तुमच्या कुटुंबाने कष्ट सोसले आहेत. त्यामुळे मिळालेल्या यशाचे चीज करा आणि रुग्णांची सेवा करा. वैद्यकीय क्षेत्र सुधारण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. वैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी परिश्रम घेऊ, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महासैनिक दरबार हॉल येथे रविवारी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘एमबीबीएस 2019 अशोका बॅच’च्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही शिक्षण पूर्ण केले आहे. या विषाणूवर वैद्यकीय क्षेत्रातील वैज्ञानिक प्रगतीमुळेच आपण मात करू शकलो. पैशात प्रत्येक गोष्टीचे मोल करू नका. गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात द्या. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समन्वय साधा आणि विश्वास निर्माण करा. धर्मादाय रुग्णालयांनी प्रामाणिक रुग्णसेवा दिली पाहिजे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, एमबीबीएस 2019 च्या बॅचने महामारीतही यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केले आहे. आता स्पर्धा प्रचंड वाढली आहे. एमडी, एमएससाठी मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील बदल स्वीकारायलाच हवेत. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे औषधोपचार देताना रुग्ण व नातेवाईकांशी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे.
मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. रेश्मा पवार, डॉ. अजित लोकरे, डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. राहुल पाटील यांच्यासह डॉक्टर, पालक व पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. केतन ठाकूर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. कल्याणी झा व डॉ. प्रज्वल पोरवाल यांनी केले. आभार डॉ. सूरज सपकाळ यांनी मानले.