पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur violence | प्रचंड तणाव; पोलिसांचा मोठा फौजफाटा, रात्री उशिरापर्यंत दोन्ही जमाव आक्रमक

परिसरातील वाहतूक काही काळ रोखली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दंगलीमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा प्रचंड फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. तरीही रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक होता. दरम्यान, सिद्धार्थनगरच्या दिशेने पेट्रोल भरलेल्या दोन बाटल्या फेकण्यात आल्या. याच दरम्यान सिद्धार्थनगर कमानीसमोरील निळा ध्वज फाडल्याचे लक्षात येताच जमाव आक्रमक झाला. जमावाने समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या जमावावर दगडफेक सुरू केली. यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. या परिसरात काही काळ धुमश्चक्रीच उडाली. या परिसरातील काही फलकही फाडण्यात आले. दोन्ही बाजूचा जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सीपीआर चौकातून तोरस्कर चौक, शिवाजी पुलाकडे जाणार्‍या नागरिकांना, वाहनधारकांनाही काही समजत नव्हते. त्यांचीही धावपळ उडाली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी आले. परिस्थितीची भीषणता लक्षात येताच जादा कुमक मागवण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. मात्र, दोन्ही बाजूंनी आक्रमक झालेल्या जमावाला नियंत्रण करताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत होती. यानंतर पोलिसांच्या अनेक तुकड्या दाखल झाल्या. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलिस उपअधीक्षक महेश सावंत आदींसह शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, अन्य विभागाचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल होताच दोन्ही बाजूच्या जमावाला नियंत्रणात आणण्यात काही प्रमाणात यश आले. यानंतर दोन्ही बाजूला जमाव थांबून होता. संबंधितांवर कारवाई झाल्याखेरीज घरी जाणार नाही, हल्लेखोरांना आमच्यासमोर आणा, निळा ध्वज पाडणार्‍याला समोर आणा, अशी आक्रमक मागणी जमाव करत होता. त्यातून काहीजण पुन्हा दुसर्‍या जमावावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे थांबलेल्या जमावाला पोलिस घरात परत जाण्यास भाग पाडत होते. मात्र, दोन्ही जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ताही घटनास्थळी आले. जमावाने कमानीसमोर झेंडा पुन्हा लावण्याची विनंती केली. त्यावर पोलिसांसोबत काही तरुणांनी जाऊन हा झेंडा लावला. यानंतर जमाव काहीसा शांत झाला. संबंधित सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर जमाव मागे हटण्यास तयार झाला. तरीही रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूचा जमाव आणि मध्यभागी पोलिसांचा फौजफाटा असे चित्र होते.

या दगडफेक, तोडफोडीत पोलिस कर्मचार्‍यांसह दहाजण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांची नावे सांगण्यास नकार देण्यात आला. एक जखमी पोलिस रक्तबंबाळ अवस्थेतील हाताला रुमाल बांधून जमावाला शांत करत होता. दगडफेकीदरम्यान दगड लागून तिघेजण किरकोळ जखमी झाले तर यावेळी झालेल्या पळापळीत गटारीत दोघेजण पडून त्यांच्या हाताला व पायाला जखम झाली.

सीपीआर चौकातील वाहतूक अडवली

सीपीआर चौक व तोरस्कर चौकात पोलिसांनी शिवाजी पूल आणि दसरा चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक बॅरिकेडिंग लावून वाहतूक बंद करण्यात आली. पोलिस सिद्धार्थनगरकडे कोणालाही जाऊ देत नव्हते. दरम्यान सीपीआर चौकातही बघ्यांची गर्दी जमली होती. त्यात प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने सीपीआर चौकातील वातावरणही तणावपूर्ण बनले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT