Phulewadi fire station slab collapse | ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्लॅब कोसळला Pudhari File Photo
कोल्हापूर

Phulewadi fire station slab collapse | ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे स्लॅब कोसळला

समितीच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष; सात दिवसांत सविस्तर अहवाल देणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर तत्काळ महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शहर अभियंता रमेश मस्कर यांची समिती नेमली होती.

या समितीने सादर केलेल्या अहवालात ठेकेदार शशिकांत पोवार व कनिष्ठअभियंता प्रमोद बराले यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. या कामात तळमजल्यावर स्टेशन ऑफिसर केबिन, कंट्रोल रूम, टॉयलेट व दोन फायर फायटिंग गाड्यांसाठी जागा, तर पहिल्या मजल्यावर वेटिंग रूम व टॉयलेट बांधकामाचा समावेश होता.

प्रशासकीय मान्यता व कामाची पार्श्वभूमी...

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला.

चौकशीत उघड झालेली निष्काळजीपणाची प्रकरणे

शटरिंगबाबत इंजिनिअरचा अहवाल न घेता काम

स्ट्रक्चरल इंजिनिअरने दिलेल्या सूचनांनुसार शटरिंग व फॉर्मवर्कची पूर्तता करून त्याचा पाहणी अहवाल घेणे आवश्यक होते; परंतु ठेकेदाराने हा अहवाल न घेता थेट काम सुरू केले.

काँक्रीट लिफ्ट ट्रॉलीतील तांत्रिक त्रुटी

काँक्रीट वाहतुकीसाठी ठेवलेली ट्रॉली दोन पोलवर उभारली. त्यासाठी चार पोल आवश्यक होते. यामुळे ट्रॉलीचा दबाव स्लॅबवर आला व झालेल्या कंपनामुळे स्लॅब कोसळल्याचे समितीने नमूद केले आहे.

रात्री काम सुरू केल्याने धोका वाढला

डबल हाईट स्लॅब हे तांत्रिक काम असून ते दिवसा करणे आवश्यक होते; मात्र हे काम रात्री केले गेले. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वाढली.

साईट इंजिनिअर अनुपस्थित

स्लॅबसाठी साईट इंजिनिअर उपस्थित असणे गरजेचे होते. ठेकेदाराने फक्त सेंट्रिंग ठेकेदाराकडून काम करून घेतले. त्यामुळे हलगर्जीपणा झाला.

कनिष्ठ अभियंता हजर नव्हता

विभागीय कार्यालय क्र.2 छत्रपती शिवाजी मार्केटकडील कनिष्ठ अभियंता यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी केवळ सकाळ-सायंकाळी पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT