Gadhinglaj Rains
गडहिंग्लजमध्ये पूरबाधित क्षेत्रातील साहित्य सुरक्षित ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. Pudhari News Network
कोल्हापूर

Kolhapur Rains | गडहिंग्लजमध्ये संततधार कायम: नदीकाठच्या नागरिकांची धडधड वाढली

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज: पुढारी वृत्तसेवा : संततधार पाऊस अन् अशातच आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब झाल्याने हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. तालुक्यातील भडगाव पुलासह सहा बंधार्‍यांवर पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गडहिंग्लज शहरासह नदीकाठच्या गावांलगत नागरी वस्तीच्या दिशेने पुराच्या पाण्याची आगेकूच सुरु राहिल्याने येथील नागरिकांची धडधड वाढली आहे. तर पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांकडून साहित्य सुरक्षित ठेवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. (Kolhapur Rains)

आजरा तालुक्यात पावसाची संततधार सुरु

दरम्यान, हिरण्यकेशीवरील एकमेव खुला असलेला गजरगाव बंधाराही आज (दि. २५) सकाळी पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागासह चंदगड तालुक्यात जाण्यासाठी सुरु असलेली पर्यायी वाहतूक खंडित झाली आहे. पश्चिम घाटासह आजरा तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून हिरण्यकेशी व घटप्रभा या नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. (Kolhapur Rains)

निम्म्याहून तालुक्याचा संपर्क खंडित

तीन दिवसांपूर्वी भडगाव पूल पाण्याखाली गेल्याने निम्म्याहून अधिक तालुक्याचा थेट संपर्क खंडित झाला आहे. या भागासह चंदगड तालुक्यात जाण्यासाठी सध्या आजरा तालुक्यातील गजरगाव बंधारामार्गे वाहतूक सुरु होती. मात्र, सकाळी गजरगाव बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. सतर्कता म्हणून या ठिकाणाहून वाहतूक बंद करण्यात आली आहे. (Kolhapur Rains)

पूरबाधित क्षेत्रांतील नागरिक धास्तावले

तालुक्यात ऐनापूर, जरळी, निलजी हे प्रमुख मार्गांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत. पूर्व भागाचा तालुका मुख्यालयाशी होणारा संपर्क पूर्णतः खंडित झाला आहे. नदी काठालगतच्या गावांजवळ मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढल्याने संभाव्य पूरबाधित क्षेत्रांतील नागरिक धास्तावले आहेत. (Kolhapur Rains)

नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता

आजरा तालुक्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब झाल्याने जराशा पावसातही हिरण्यकेशीमधील पाण्याचा विसर्ग वाढणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. पाणी आलेल्या बंधार्‍यांवरुन कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, घटप्रभा नदीवरील कानडेवाडी बंधाराही पाण्याखाली गेल्याने सांबरे परिसरातील गावांचा थेट संपर्क तुटला आहे.

SCROLL FOR NEXT