कसबा बावडा : कसबा बावडा येथील पहिल्या प्रभागात काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांनी एकास एक उमेदवार दिले आहेत. पहिल्यांदाच होत असलेल्या चार सदस्यीय प्रभागात काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. दुरंगी लढतीमुळे परिसरातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या प्रभागातून सोमवारी एक अपक्ष व महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कसबा बावड्यात काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना 42 इच्छुकांपैकी चारजणांना उमेदवारी देऊन उर्वरितांची समजूत काढण्यात पहिल्या टप्प्यात काँग्रेसचेेआमदार सतेज पाटील यशस्वी झाले आहेत. दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये चर्चा होऊन कसबा बावड्यातील चारही मतदारसंघांत शिवसेनेला (शिंदे गट) उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. या कामी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व समन्वयक सत्यजित कदम यांची भूमिका निर्णायक ठरली.
दरम्यान, भगवा चौक येथे मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान काँग्रेस, शिवसेना, भाजप पक्षाच्या उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली होती. काँग्रेस समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रॅलीने निवडणूक निर्णय अधिकारी क्र. 1 यांच्याकडे अर्ज दाखल केले. शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार व समर्थक यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीने अर्ज दाखल केले. गर्दीने दोन ते तीन तास भगवा चौक गजबजला होता. पक्षांचे झेंडे आणि स्कार्फ घातलेले उमेदवार समर्थकांसह चौकात वावरताना दिसत होते.
यांच्यात होत आहेत लढती
कसबा बावड्यात काँग्रेसकडून सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, सचिन चौगले व रूपाली पोवार, तर शिवसेनेकडून अमर साठे, प्रियंका उलपे, गीता जाधव व कृष्णा लोंढे हे निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. याशिवाय काही अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत.