चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. तालुकानिहाय बैठका, सभा, मेळावे यातून नेत्यांचे व पक्षाचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. जेथे मेळावे झाले आहेत तेथून स्वकीयांसह विरोधकांनाही आव्हाने दिली जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत, तर काँग्रेसची स्वबळावर लढण्याच्या द़ृष्टीने वाटचाल सुरू आहे.
महापालिकेच्या राजकारणातून नेते व कार्यकर्ते बाहेर पडण्यापूर्वीच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. येत्या दि. 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे.
स्वबळावळ लढण्याची तयारी करणार्या काँग्रेस व राष्ट्रवादीने यातील पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काँग्रेस पक्षाकडे 350 हून अधिक अर्ज आजवर दाखल झाले असून त्यांची अर्ज विक्री व स्वीकृती सुरू आहे. राष्ट्रवादीने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या तालुकानिहाय भेटीगाठी सुरू आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जेथे एका मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे तेथे इच्छुकांची संख्या जास्त असते व प्रत्येकाला संधी देता येत नाही. कोल्हापूर महापालिकेत एका मतदारसंघातून चार सदस्य निवडून द्यायचे असल्याने तेथे महायुती झाल्याचे सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एका मतदारसंघातून एकाच सदस्याची निवड करायची आहे. तेथे युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून ती नाही झाली, तर मैत्रीपूर्ण लढती होतील व मित्रपक्षांवर टीका न करता निवडणूक लढवावी लागेल, असे सांगत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 81 पैकी 74 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते ठाकरे शिवसेनेला केवळ सात जागा दिल्या होत्या. शरद पवार राष्ट्रवादीला त्यांनी दोन जागांची ऑफर दिली होती. ती त्यांनी नाकारत समविचारी पक्षांना घेऊन तिसरी आघाडी केली होती. ही काँग्रेसच्या स्वबळाची तयारी होती, असे मानले जाते.
दरम्यान, रविवार, दि. 17 रोजी महायुतीच्या घटक पक्षांची महायुती म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यासाठी प्राथमिक बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपकडून चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ व शिवसेनेकडून प्रकाश अबिटकर हे उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या 68 व पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
इच्छुकांची मुंबई-पुण्यातील मतदारांकडे धाव
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नियोजित वेळेपेक्षा उशिरा होत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीमुळे पक्षांची संख्याही वाढली आहे. त्यातून उमेदवारातील ईर्ष्या आताच टोकाला गेली आहे. एका-एका मतासाठी इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काही इच्छुक उमेदवारांनी पुणे- मुंबईतील मूळच्या कोल्हापूरकरांशी संपर्क मोहीम व्यापक केली आहे. काहीनी मेळावेही आयोजित केले आहेत.