कोल्हापूर : राज्यातील महापालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत. बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागांतून इतर प्रभागांमध्ये गेली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा, अशी मागणी काँग््रेासचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
बऱ्याच महापालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभाग निहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत, बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागांतून इतर प्रभागांमध्ये गेली आहेत. ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पद्धतदेखील अत्यंत किचकट असून, प्रत्येक व्यक्तीने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून, सोबत आधार कार्ड जोडायचे आहे. ही पद्धत किचकट व वेळकाढू आहे. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱ्याच्या योग्य ती हरकत व सूचना निदर्शनास आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलची तक्रार स्वीकारली पाहिजे.
मात्र, तसे होत नाही. मतदार याद्यांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या मतदार याद्या तपासण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून, ती 15 दिवसांनी वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.