राहुल गांधी यांनी कोल्हापूर- उचगाव येथील टेम्पोचालकाच्या घरी जेवण बनवण्यासाठी मदत केली. (Image source- Rahul Gandhi X account)
कोल्हापूर

राहुल गांधींनी टाकली भाजीला फोडणी! कोल्हापूर दौऱ्यातील Video केला शेअर

Rahul Gandhi Kolhapur visit : टेम्पोचालकाच्या घरी बनवली हरभरा, वांग्याची भाजी...

पुढारी वृत्तसेवा

उचगाव (कोल्हापूर) : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडिओ (Video) सोमवारी त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडिओत राहुल गांधी कोल्हापूर- उचगाव येथील टेम्पोचालक अजय तुकाराम सनदे यांच्या घरातील स्वयंपाकघरात गप्पागोष्टी करत भाजीला फोडणी टाकताना दिसतात.

''त्यांनी मला आदरपूर्वक महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील त्यांच्या घरी बोलावले आणि मला स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली. आम्ही इथे हरभऱ्याची भाजी आणि वांग्यासोबत तूर डाळही बनवली.'' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भाजीला दिली फोडणी....

गेल्या शनिवारी राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. वेळ सकाळी सव्वादहाची.. कोल्हापूर शहरालगत असलेल्या उचगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका घरासमोर पोलिसांसह चारचाकींचा ताफा थांबला. शस्त्रधारी सुरक्षा रक्षक आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गराड्यातून काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उतरले आणि एका टेम्पोचालकाच्या घरात शिरले. गप्पागोष्टी करताना, त्यांनी घरातील स्वयंपाकगृहाचा ताबा घेतला, कांदापात, हरभरा आणि वांगी अशा तीन भाज्याही त्यांनी केल्या. केवळ भाज्या केल्या नाही तर त्या कुटुंबासमवेत बसून त्यांनी त्या भोजनाचा आस्वादही घेतला.

Rahul Gandhi Kolhapur visit : सनदे कुटुंबीयांसह गावकरीही भारावले...

गांधी यांनी टेम्पोचालक अजय सनदे व त्याच्या कुटुंबीयांशी तब्बल एक तास घालवत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला होता. या भेटीने सनदे कुटुंबीयांसह गावकरीही भारावले. सकाळी दहा वाजता विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन झाले. तेथून त्यांचा ताफा थेट उचगावात वळला. दलित समाजातील सनदे यांच्या साध्या कौलारू घरी ते गेले. अजय यांच्यासह त्यांची पत्नी अंजली, मुलगा आदित्य, अभिषेक यांनी त्यांचे स्वागत केले. चहा नाश्ता करत, त्यांनी सनदे कुटुंबीयाशी गप्पा मारल्या. याचवेळी स्वयंपाकगृहात ठेवलेल्या भाज्या पाहून राहुल यांनी थेट स्वयंपाकगृहात प्रवेश करत भाज्या करण्यास सुरुवात केली. अंजली यांनी भाकरी केल्या, यानंतर त्यांनी स्वतः केलेल्या भाज्यांचा भाकरीसोबत आस्वाद घेतला. सनदे कुटुंबीयानी त्यांना संविधान प्रस्तावनेचे पोस्टर आणि काही पुस्तके दिली. यावेळी सतीश अण्णा भोसले, गणेश भोसले, बाबासाहेब चौगुले उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT