कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मदत काँग्रेसची आणि खासदार दुसर्या पक्षाचा, हे आता बदलले पाहिजे. यामुळे गेले वीस-पंचवीस वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काँग्रेसचा हात गायब झाला आहे. आता वेळ आली आहे. दोन्ही खासदार जातीयवादी पक्षासोबत गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर रविवारी केली.
लोकसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका आयोजित केल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आहे. रविवारी काँग्रेस समितीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणार्या सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही दुसर्याच पक्षाचा खासदार निवडून देत आहे. ते आपल्याशी प्रामाणिक राहत नाहीत. गेल्या निवडणुकीतील उमेदवारही जातीयवादी सरकारला पाठिंबा देणार्या पक्षात गेले. त्यामुळे यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली. काही कार्यकर्त्यांनी गद्दारी करणार्या खासदारांवर आरोप करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना रोखण्यात आले.
आ. चव्हाण म्हणाले, आपल्या मतदारसंघातील मते, विरोधकांना मिळालेली मते, त्यातील पक्षाची, विचाराची मते किती आणि राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीमुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती यावर कार्यकर्त्यांनी मते व्यक्त करावीत, असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, निरीक्षक अभय छाजेड, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब खाडे, सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर आदी उपस्थित होते. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील माहिती दिली.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा प्रथम आढावा घेण्यात आला. यामध्ये शशिकांत खोत, भरत रसाळे, अमर समर्थ, शंकर पाटील यांनी मते मांडली. कोल्हापूर उत्तरमध्ये सचिन चव्हाण, भारती पोवार, तौफिक मुल्लाणी, प्रकाश नाईकनवरे यांनी मते मांडली. करवीर विधानसभा मतदारसंघातील चर्चेमध्ये बाजीराव खाडे, बयाजी शेळके, सुनील खाडे, तर राधानगरी, भुदरगड मतदारसंघातील चर्चेत हिंदुराव चौगले, शामराव देसाई, सत्यजित पाटील, जीवन पाटील आदींनी भाग घेतला. चंदगड विधानसभा मतदारसंघाबाबत संभाजी देसाई, विद्याधर गुरंबे, गोपाळराव पाटील, अंजनाताई रेडेकर आदींनी मते मांडली. संजय वाईकर यांनी प्रास्ताविक केले.
उमेदवार कोण? सतेज पाटील की पी. एन. पाटील?
कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले खासदार प्रामाणिक राहिले नाहीत याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर येत्या निवडणुकीत सतेज पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी आ. पी. एन. पाटील यांनी केली. यावर आ. पाटील यांनी पक्षाशी प्रामाणिक असणारे पी. एन. पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, म्हणजे भविष्यकाळात आपल्याला काही धोका नाही, असे सांगितले.
सर्वांनी हे पथ्य पाळूया!
एक कार्यकर्ता आ. ऋतुराज पाटील यांच्या विरोधात 2019 च्या निवडणुकीत बोलला होता. त्याचा व्हिडीओ मी पहिला. तो भेटायला आल्यानंतर त्याला मी भेट नाकारली. हे पथ्य काँग्रेसमधील सर्वांनीच पाळले पाहिजे. एकमेकांबद्दल उलटसुलट सांगून गैरसमज निर्माण करणार्यांना आपण बाजूलाच केले पाहिजे, असे आ. पी. एन. पाटील म्हणाले.