कोल्हापूर : अवसायन प्रक्रियेतील ९५८ दूध संस्थांचा पात्र, अपात्रतेचा गोंधळ बुधवारपर्यंत मिटण्याची शक्यता आहे. दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सुनावणी पूर्ण झालेल्या संस्थांचे निकाल पत्र तयार करण्याचे काम सहायक निबंधक कार्यालयात युध्दपातळीवर सुरू आहे. आता केवळ १२७ दूध संस्थांची सुनावणी बाकी असून सोमवारपासून (दि. ८) या संस्थांच्या सुनावणी होतील.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर केलेल्या संस्था सभासदांच्या यादीमधील १,३२० दूध संस्थांवर तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी आक्षेप घेतला. या संस्थांवरून गेले तीन महिने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. राजकीय ताणतणावातून या संस्थांची सुनावणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवार, १० जूनपर्यंत अवसायनातील किती संस्था पात्र व अपात्र ठरणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संस्था पात्र-अपात्रतेबाबत लवकरच स्पष्टता
ठराव मसुदा पत्र मिळाल्यानंतर संबंधित संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन ठराव कोणाच्या नावे द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत असते. त्यामुळे अवसायनातील दूध संस्थांना अंतिम टप्प्यात निकाल पाठविल्यास संचालक मंडळाच्या बैठकीवर आक्षेप घेतले जाऊ शकतात. २ जुलैपर्यंत ठराव सादर करण्याची मुदत आहे. त्यामुळे किमान १० जूनपर्यंत संस्था पात्र, अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागेल, अशी चर्चा सध्या दूध संस्थांच्या वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे संस्था पात्र, अपात्रतेचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
१०६ संस्था गैरहजर, २१ राधानगरीतील
सुनावणी प्रलंबित असलेल्या १२७ संस्थांपैकी १०६ संस्था या यापुर्वी झालेल्या सुनावणीस गैरहजर राहिल्या आहेत. त्यामुळे या संस्थांच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर २१ संस्था या राधानगरी तालुक्यातील आहेत. तर १३२० पैकी ९५ संस्था गोकुळशी संलग्न नाही आहेत. तर तत्कालीन सहा. निबंधक सुजय कदम यांनी २६७ संस्थांना निकाल देत त्या पात्र ठरविल्या आहेत.