कोल्हापूर : दि. 16 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीने माझ्या नाष्टा सेंटरवर इडली खाल्ली, त्यानंतर ते सावकाश चालत घरी गेले. थोड्या वेळात पानसरे दाम्पत्यांवर हल्ला झाल्याचे समजले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष प्रतिभानगर येथील चहा-नाष्टा विक्री स्टॉलचे चालक व्यंकटेश सदानंद शेनॉय यांनी शनिवारी दिली.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात पानसरे खून खटला सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे यांनी व्यंकटेश यांची साक्ष घेतली. बचाव पक्षाचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही उलट तपास घेतला.
तपासाधिकार्यांनी खटल्यात साधारणत: 240 जणांचे जबाब नोंदविले आहेत. 28 व्या क्रमाकांचे साक्षीदार व्यंकटेश शेनॉय यांची साक्ष झाली. त्यांनी सांगितले की, प्रतिभानगर, रेड्याच्या टक्कर मैदानाजवळ रस्त्याकडेला चहा, नाष्ट्याची टपरी आहे. दररोज सकाळ- सायंकाळ आपण स्वत: टपरीवर असतो. कॉ. पानसरे दाम्पत्यांवर ज्या दिवशी हल्ला झाला. तेव्हा थोड्या वेळेपूर्वी माझ्या टपरीवर आले होते. त्यांनी इडली खाल्ली. 60 रुपयांचे बिलही हातावर ठेवले, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी शेनॉय याचा उलट-तपास घेतला. खटल्याची पुढील सुनावणी 20 मे रोजी होणार आहे.