म्हासुर्ली : धामणी खोर्यातील जनतेने पाण्याची मोठी प्रतीक्षा केली. या प्रतीक्षेत मोठा संघर्षही सोसला. मात्र, दिलेला शब्द तर लोकांच्या चेहर्यावर आनंद पसरवण्यासाठी केलेला निश्चय यातून हा संघर्ष संपुष्टात येत आहे. येत्या दिवाळीत अभ्यंगस्नान हे ‘धामणी’च्या पाण्यानेच करून आनंदसोहळा साजरा करू, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते धामणी प्रकल्पग्रस्त वसाहतींत सार्वजनिक सुविधांचा लोकार्पण, धामणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा घळभरणी समारोपप्रसंगी बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जनतेच्या चेहर्यावरील आनंद हाच आपला आनंद आहे. हाच आनंद जनतेच्या चेहर्यावर अधिकाधिक प्रस्तापित व्हावा, यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांतूनच मतदारसंघाची पाणीदार अशी ओळख निर्माण झाली आहे.
धामणी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घळभरणी पूर्ण झाली असून, यात एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी अडणार आहे. या पाण्याचा शेतकर्यांना पुरेपूर लाभ होणार आहे. पावसाळ्याला अवधी आहे. दरम्यानच्या काळात कामाला अधिकाधिक गती देऊन अधिकाधिक पाणीसाठा व्हावा, यासाठी प्रयत्नशिल राहावे, असे सांगून आबिटकर म्हणाले. यावेळी राधानगरी, कागल, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, संग्राम पाटील, प्रशांत कांबळे आदींसह कृती समिती, प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले, दिवाळीत घळभरणीचा दिवस निश्चित होता. कार्यक्रमास मुख्यमंत्री येणार म्हणून लोकांच्या नजरा लागल्या होत्या; पण पावसामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाला मर्यादा येऊ लागल्या. आपल्या प्रतीक्षेत पावसात लोक भिजत थांबले असल्याचे मी फोनवरून त्यांना सांगितले. त्यानंतर धोका पत्करत हेलिकॉप्टरने कार्यकम स्थळी पोहोचले. लोकांची मने जिंकणारा नेता अनाथांचा नाथ एकनाथ म्हणताच लोकांनी जोरदार टाळ्या वाजविल्या.