सरुड (ता. शाहूवाडी) : येथे पदवीधर मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. 
कोल्हापूर

Graduate Constituency Election | ‘पदवीधर’साठी चुरशीने ६३.८३ टक्के मतदान

शिक्षक मतदार संघातही जिल्ह्यात ईर्ष्येने 88.62 टक्के मतदान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी जिल्ह्यात चुरशीने ६३.८३ टक्के मतदान झाले. शिक्षक मतदारसंघात ईर्ष्येने ८८.६२ टक्के मतदान झाले. मतदानासाठी कोल्हापूरकरांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांत उत्साह होता. पदवीधर मतदारसंघात महायुतीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख अशी थेट दुरंगी लढत आहे. शिक्षक मतदारसंघात महायुतीचे भाजपचे कौस्तुभ गावडे, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार प्रा. जयंत आसगावकर आणि शिवसेना शिंदे गटाचे सचिन सानप असा तिरंगी सामना होत असून त्यांना दत्तात्रय सावंत यांचेही आव्हान आहे.

‘पदवीधर’साठी २१२ तर ‘शिक्षक’साठी ७० मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. तत्पूर्वीच सकाळी सात-साडेसातपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांग लावली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांशी मतदान केंद्रांवर पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधींसह मतदारांचीही गर्दी व वर्दळ वाढलेली होती. प्रारंभीच्या पंधरा-वीस मिनिटांनंतर सकाळी मतदान प्रक्रियेने गती घेतली.

मतदान केंद्रांत मतदान करण्यासाठी दोन स्वतंत्र कक्ष

उमेदवार अधिक असल्याने, मतदान करण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन मतदान प्रक्रियेला विलंब होणार नाही, यासाठी एकाच मतदान केंद्रांत एकाच वेळी दोन मतदारांना मतदान करण्याची सुविधा दिली होती. त्याकरिता मतदान केंद्रांत मतदान करण्यासाठी दोन स्वतंत्र मतदान कक्ष (मतदान बॉक्स) ठेवले होते.

मतदान केंद्रांबाहेर शंभर मीटर अंतरावर उमेदवारांचे बूथ लावण्यात आले होते. त्या ठिकाणी उमेदवार, त्यांच्या पक्षांची गर्दी होती. मतदारांना केंद्र क्रमांक, खोली क्रमांक, मतदार यादीतील अनुक्रमांक यांची मतदार चिठ्ठी करून दिली जात होती. यानंतर मतदार मतदानासाठी मतदान खोलीत जात होते. मतदान केंद्रांवर मतदान कर्मचाऱ्यांकडून मतदानाच्या प्रक्रियेची माहिती देत होते. मतपेटीत मतपत्रिका टाकताना मतदारांना काही ठिकाणी अडचण येत होती.

पहिल्या ४ तासांत ‘पदवीधर’चे २६, तर ‘शिक्षक’चे ३५ टक्के मतदान

पहिल्या तासातच सकाळी नऊ वाजेपर्यंत बहुतांशी केंद्रांवर ‘पदवीधर’साठी आठ टक्क्यांवर मतदान झाले होते तर ‘शिक्षक’साठी ११ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. सकाळी आठ ते दुपारी १२ या चार तासांत ‘पदवीधर’साठी २६.२८ टक्के मतदान झाले होते. शिक्षक मतदार संघात मतदानाचा वेग तुलनेने अधिक होता. या मतदारसंघात ३५.५८ टक्के मतदान झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ‘पदवीधर’ची टक्केवारी ४३.७१ टक्क्यापर्यंत तर ‘शिक्षक’ची टक्केवारी ६२.८७ टक्क्यापर्यंत गेली.

अखेरच्या दोन तासांत गती

मतदानाच्या अखेरच्या दोन तासांत मतदानाला गती आली. दुपारी दीड ते अडीच-तीनपर्यंत मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. अखेरच्या तासात मतदानाला गती आली. अनेक मतदार अखेरच्या अर्ध्या तासात धावत मतदान केंद्रांकडे येत होते. वेळेत केंद्रांवर पोहोचलेल्या मतदारांची रांग दुपारी ४ नंतरही काही केंद्रांवर होती. दुपारी दोन ते चार या वेळेत ‘पदवीधर’साठी २० टक्के तर ‘शिक्षक’साठी २६ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील ‘पदवीधर’च्या सर्व केंद्रांवरील २७२ मतपेट्या आणि ‘शिक्षक’च्या सर्व केंद्रांवरील ७० मतपेट्या रमणमळा येथील शासकीय गोदामात रात्री जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत जमा करून घेण्यात आल्या.

कोल्हापूर ‘पदवीधर’मध्ये ४७ उमेदवार; घडी घातलेली मतपत्रिका

पदवीधर मतदारसंघात ४७ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे मतदारांना घडी घातलेली मतपत्रिका दिली जात होती. ती उघडून त्यावर आपल्या उमेदवारांपुढे पसंती क्रमांक देऊन पुन्हा त्याच पद्धतीने मतपत्रिकेची घडी घालून ती मतपेटीत टाकण्यात येत होती. या प्रकियेला काहीसा वेळ लागत होता. मात्र मतदान केंद्रांतील मतदान कर्मचाऱ्यांकडून गतीने प्रक्रिया पार पाडली जात होती. शिक्षक मतदार संघासाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे ‘पदवीधर’च्या तुलनेत ‘शिक्षक’ची मतपत्रिकेची घडी लहान होती.

विधानसभा, महापालिकांसारखा माहोल

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी जिल्ह्यात चुरशीने मतदान झाले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्र आणि परिसरात विधानसभा, महापालिका निवडणुकांसारखा माहोल होता.

नव मतदारांचा उत्साह....अन्‌ आनंद

पदवीधर मतदार संघासाठी मतदान करणाऱ्यांत नवमतदारांचाही संख्याही लक्षणीय होती. आपला हक्काचा प्रतिनिधी निवडण्यासाठी होणाऱ्या या मतदानाबाबत त्यांच्यात उत्साह होता. मतदान करणाऱ्यासाठी येणाऱ्या मतदारांच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत होता. मतदान केल्यानंतरचाही आनंद ते सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही एकमेकांशी शेअर करत होते.

पदवीधर मतदार संघ (सर्वाधिक मतदान) (टक्के)

केंद्र क्र. ५४७ विद्या मंदिर पडळ, ता.करवीर खोली क्रमांक ३ ७७.६९

केंद्र क्र. ५४३ जीवन विद्या मंदिर, कोतोली खोली क्रमांक ३ ७४.२३

केंद्र क्र. ५९० न्यू इंग्लिश स्कूल, जयसिंगपूर खोली क्रमांक ३ ७३.९६

केंद्र क्र. ५९९ एस.पी.हायस्कूल कुरूंदवाड, खोली क्रमांक १ ७३.५८

केंद्र क्र. ६०४ नृसिंहवाडी, ता. शिरोळ ७३.३३

पदवीधर मतदार संघ (सर्वात कमी मतदान) (टक्के)

केंद्र क्र. ५६३ कुमार विद्या मंदिर वाठार तर्फ वडगाव खोली क्रमांक १ ४८

केंद्र क्र. ५३१ भेडसगाव, ता. शाहूवाडी ५५.३२

केंद्र क्र. ५३८ केंद्रीय कुमार विद्या मंदिर कोडोली खोली क्रमांक ४ ५६.५९

केंद्र क्र. ६१५ विद्या मंदिर बालिंगा, खोली क्रमांक ड ५६.८३

केंद्र क्र. ५३४ बांबवडे, ता. शाहूवाडी ५७.१४

शिक्षक मतदार संघ (सर्वाधिक मतदान) (टक्के)

केंद्र क्र. ३०७ , नागनवाडी, ता. चंदगड ९८.३३

केंद्र क्र. २५१ बाजार भोगाव, ता. पन्हाळा ९८.३१

केंद्र क्र. २६६ दत्तवाड, ता. शिरोळ ९७.७३

केंद्र क्र. २६४ शिरढोण, ता. शिरोळ ९६.२७

केंद्र क्र. २६० विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर

खोली क्रमांक ८, इचलकरंजी ९६.०६

शिक्षक मतदार संघ (सर्वात कमी मतदान)

केंद्र क्र. २७९ मेन राजाराम हायस्कूल कोल्हापूर खोली क्रमांक ९ ७८.८७

केंद्र क्र. २४३ मलकापूर, ता. शाहूवाडी ८०

केंद्र क्र. २७५ कुडित्रे, ता. करवीर ८०.२३

केंद्र क्र. २५६ वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले ८०.४१

केंद्र क्र. २७३ हळदी, ता. करवीर ८१.४२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT