कोल्हापूर : गजापुरात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. सोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व इतर. Pudhari File Photo
कोल्हापूर

गजापूरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ

पीडितांना लवकरच नुकसान भरपाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर/विशाळगड : गजापूरमधील जनजीवन पूर्वपदावर आणण्यास शासनाचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिली़. विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यावरून गेल्या रविवारी गजापूर येथे आंदोलकांनी घरांवर दगडफेक करून मोठे नुकसान केले. याची मुश्रीफ यांनी पाहणी केली.

गजापूरमधील मुसलमानवाडीतील घरांची आंदोलकांनी तोडफोड करून प्रार्थनास्थळाचे नुकसान केले होते. नुकसान झालेल्या भागातील पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा आढावा पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतला. यावेळी ग्रामस्थ, पीडित महिला, पुरुष यांच्याशी त्यांनी संवाद साधला. दंगलीत पडझड झालेल्या भागाची पाहणी केली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी पीडितांना दिलासा देत शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. कोणीही घाबरून न जाता आपापल्या कुटुंबाला सावरा, असा दिलासा दिला. गावात विशाळगडसारखी कायमस्वरूपी पोलिस चौकीची उभारणी करावी, अशी मागणी गावातील लोकांनी केली. यावर मंत्री मुश्रीफ यांनी पोलिस चौकी उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच न्यायालयाकडून अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशाचा अभ्यास करून 29 जुलैला होणार्‍या पुढील सुनावणीदरम्यान प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोल्हापूरला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे. इथे अशी दुर्दैवी घटना घडायला नको होती. या घटनेची राज्यस्तरीय चौकशी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गावात तातडीची मदत म्हणून शासनाने प्रत्येकी 50 हजारांची मदत केलेली आहे. नुकसानीबाबत पंचनामे करून 2 कोटी 85 लाख रुपयांचा नुकसानभरपाई प्रस्ताव शासनाने तयार केलेला आहे. ही मदत पीडितांना लवकरात लवकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावात आल्यानंतर ही मदत तातडीने देणार असल्याचे जाहीर केले होते.

‘त्यांना’ तिथे येणे गरजेचे होते !

आता कोणी म्हणेल, काँग्रेसचे लोक एवढ्या लवकर तिथे कसे पोहोचले; पण त्यांना तिथे येणे गरजेचे होते. कारण, वडील आणि मुलगा अशा एकाच घरात दोन वेगवेगळ्या भूमिका निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसची मंडळी दुसर्‍या दिवशी येथे आली, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT