कोल्हापूर : खुन्नस दिल्याच्या संशयातून टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात यश सुरेश चव्हाण (वय 18, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) हा कॉलेज तरुण गंभीर जखमी झाला.नागाळा पार्क येथील कॉलेजसमोर हा प्रकार घडला. संशयित अथर्व कोले (रा. सदर बाजार), ओम सोनटक्के (रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांच्यासह 12 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
म्होरक्यासह सर्व संशयित पसार झाले असून शाहूपुरी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. जखमी यश चव्हाण याने संशयित कोले, सोनटक्केसह अनोळखी 10 ते 12 साथीदाराविरुद्ध शनिवारी फिर्याद दाखल केली. कॉलेज तरुणांवरील खुनी हल्ल्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह फौजफाटा दाखल झाल्यानंतर संशयित पसार झाले. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही डोके यांनी सांगितले.
जखमी व काही संशयित कॉलेजचे विद्यार्थी आहेत. त्याच्यात काही दिवसांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. यश चव्हाण वारंवार खुन्नस देत असल्याचा म्होरक्यासह त्याच्या साथीदारांचा संशय होता. त्यातून दोन गटांत वादावादीही झाली होती. जखमी यश शुक्रवारी दुपारी कॉलेजसमोरील रस्त्यावर मित्र हर्ष छत्रे याच्याशी बोलत असताना अथर्व कोले, ओम सोनटक्के याच्यासह 10 ते 12 जण तेथे आले. जमावाने यशला शिवीगाळ करीत लोखंडी फायटर, बेल्ट, दगडाने त्याच्यावर हल्ला चढविला. पोलिस निरीक्षक संतोष डोके पोलिस पथकांसह दाखल झाले. संशयिताचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.