सिध्दनेर्ली : पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील प्रस्तावित होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामाला असलेला तीव्र विरोध आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. महाविद्यालय तलावाच्या अगदी जवळ, गायरान जमिनीवर उभारले जात असल्यामुळे तलाव दूषित होऊन पर्यावरणाची हानी होण्याची भीती व्यक्त करत, संतप्त ग्रामस्थ, महिला आणि तरुणांनी आज (दि. १५ डिसेंबर) 'पाझर तलाव बचाव'साठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च काढला.
सकाळी नऊ वाजता पिंपळगाव खुर्द येथील बसवेश्वर देवालयाजवळ एकत्र येऊन या लॉंग मार्चला सुरुवात झाली. हा मोर्चा पिंपळगाव फाटा येथे आला आणि त्यानंतर तलावाच्या जिथे बांधकाम चालू आहे त्या जागेवर नेण्यात आला. तलावाजवळ जमलेल्या शेकडो नागरिकांनी शासनाच्या धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिकांच्या हातात तलाव बचावाचे संदेश लिहिलेले बोर्ड होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.