Collector Yedge honor | जिल्हाधिकारी येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान 
कोल्हापूर

Collector Yedge honor | जिल्हाधिकारी येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

ई-गव्हर्नन्समध्ये 150 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : प्रशासकीय कामकाजात माहिती-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरामुळे कोल्हापूर जिल्ह्याने ई-गव्हर्नन्समध्ये आघाडी घेतली आहे. राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमा’च्या अंतिम मूल्यमापनात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने 200 पैकी 177 गुण मिळवून राज्यात 5 वा क्रमांक मिळविल्याबद्दल शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माहिती -तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची याद्वारे दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘एआय-ऑफिस लेन्स’ या अत्याधुनिक उपक्रमांतर्गत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे कर्मचार्‍यांची स्वयंचलित हजेरी आणि प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालींचे विश्लेषण केले जात आहे. तसेच ‘कार्यालय कवच’ उपक्रमांतर्गत पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनावर लक्ष ठेवले जात आहे.

महसुली खटल्यांमध्ये गतिमानता आणण्यासाठी ‘एआयमित्र’ प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. क्लिष्ट प्रकरणांत कायदेशीर मसुद्यासाठी एआयच्या ‘जेमिनी’ टूल्सचा वापर होत असून निर्णयात अचूकता, पारदर्शकता आली आहे. अंबाबाई मंदिर आणि जोतिबा यात्रेतील गर्दीच्या नियोजनासाठी ‘एआय स्मार्ट क्राऊड मॅनेजमेंट’ प्रणालीद्वारे हीटमॅप्स वापरून रिअल टाईम मॉनिटरिंग केले जात आहे.

‘सेवादूत’ व्हॉटस्अ‍ॅप चॅटबॉट

नागरिकांच्या सुविधेसाठी ‘सेवादूत’ हा व्हॉटस्अ‍ॅप चॅटबॉट (9096074799) कार्यान्वित आहे. याद्वारे नागरिक तक्रारी दाखल करू शकतात, विविध दाखल्यांची माहिती घेऊ शकतात. आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाचे अपडेटस् आणि नद्यांची पाणी पातळी या चॅटबॉटद्वारे नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. विकास नियोजन जिल्ह्यातील आधार केंद्रे आणि रेशन दुकानांचे ‘गॅप अ‍ॅनालिसिस’ करण्यासाठी जीआयएस मॅपिंगचा वापर करण्यात आल्याने सुविधा नाहीत तेथे नवीन केंद्रे मंजूर करणे सोपे झाले आहे. ‘महानेट’च्या ऑप्टिकल फायबर केबल्सद्धारे रस्ते खोदाईवेळी होणारे नुकसान टाळले जाते. या यशामध्ये सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT