कोल्हापूर : जिल्ह्यातील पात्र कोणत्याही शेतकऱ्याला पीक कर्जापासून वंचित ठेवू नका, जुलैअखेर पीक कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी दिले. जिल्ह्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता तब्बल 47 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा व आरसेटीच्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन झाले. डॉ. राठोड म्हणाले, पीक कर्ज योजना आणि अन्य शासकीय योजनेंतर्गत बँकांकडील कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढा. सर्व शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणांची सप्टेंबरअखेर उद्दिष्ट्यपूर्ती करा. शासन व महामंडळांच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँका आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करा. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आदेशही त्यांनी दिले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांनी आराखड्याची माहिती दिली.
बैठकीत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पीएम स्वनिधी, स्टँड अप इंडिया, विश्वकर्मा योजना, बचत गटांना पतपुरवठा, कृषी पायाभूत विकास निधी तसेच विविध महामंडळांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बचत गटांना पतपुरवठा, पीएम स्वनिधी आदी योजनांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँक जिल्हा समन्वयकांचा सन्मान करण्यात आला.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंडके, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्रनाथ श्रीवास्तव, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंधळे, आरसेटीचे संचालक प्रशांत कापूरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महामंडळांचे प्रतिनिधी आणि बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
गतवर्षी ११४ टक्के उद्दिष्टपूर्ती
जिल्ह्यासाठी 2025-26 मध्ये 42 हजार 200 कोटी रुपयांचे पतपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. मार्च 2026 अखेर 114 टक्के उद्दिष्टपूर्ती झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सर्व बँकांचे अभिनंदन केले.