कोल्हापूर

कोल्हापूर : कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण 15 दिवसांत करा

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसांत पाळीव आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करा. त्याची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाला मंगळवारी दिल्या. रेबीजने होणार्‍या मृत्यूच्या प्रमाणात घट व्हावी, याकरिता वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणिजन्य आजार प्रतिबंध, नियंत्रण कार्यक्रम, एकात्मिक रोग सर्वेक्षण, वातावरणातील बदल व मानवी आरोग्य या विषयांवरील जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी म्हणाले, कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशासकीय संस्था, आरोग्य विभाग व पशुसंवर्धन

विभागाची मदत घ्या. रेबीज मुत्यूच्या प्रमाणात घट होण्यासाठी 'एएमआय'मार्फत खासगी व शासकीय वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभाग व बाह्यरुण विभागाकडील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचार्‍यांचे व्यापक प्रशिक्षण घ्या, असे येडगे म्हणाले.

डेंग्यूच्या रुग्णांत वाढ दिसत आहे. यामुळे गाव, नगरपालिका स्तरावर व्यापक प्रमाणात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. याकरिता स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्या. जिल्ह्यातील डेंग्यू आजाराबाबत तीव— जोखमीच्या गावांचा शोध घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ अंमलात आणा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करा, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

येडगे यांनी शेतात काम करणारे शेतमजूर, व्यायाम करणारी तरुण मुले, शालेय मुले, तसेच कायम प्रवास करणार्‍यांना जलशुष्कता (डिहायड्रेशन) होऊ नये म्हणून पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करा, वातावरणातील बदल व मानवी आरोग्यावर माझी वसुंधरा अभियानात ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका स्तरावर वृक्षारोपण व इतर विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करा व इतर कार्यवाही करण्यासाठी नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी निवडणूक मतदान प्रशिक्षण ठिकाणी कर्मचार्‍यांसाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. मतदानाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, सावलीसाठी मंडप, औषध किट यांच्या उपलब्धतेबाबत मागदर्शक केले. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी टास्क फोर्सची उद्दिष्टे, कार्य व कृती याबद्दल माहिती दिली. बैठकीला 28 समिती सदस्य उपस्थित होते.

कुत्रे चावल्यावर शासकीय रुग्णालयातच तत्काळ उपचार घ्या

कुत्रे चावल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुवा. याकरिता आशा वर्कर्सच्या मदतीने जनजागृती करा, असे सांगत बोगस डॉक्टर, भोंदू व्यक्ती तसेच इतर ठिकाणी उपचारास न जाता शासकीय दवाखान्यात तत्काळ उपचार घ्या, त्यासाठी जनजागृती करा, असे आवाहन येडगे यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT