कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वंचित घटकांतील नागरिकांनी सामाजिक न्याय विभाग तसेच त्याअंतर्गत येणार्या विविध महामंडळांच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्याद्वारे उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी 'पीएम सूरज पोर्टल'चा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला, मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी वंचित घटकांतील लाभार्थ्यांना येडगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नमस्ते आयुष्मान कार्ड, महापालिका सफाई कामगारांना पीपीई किटचे वितरण करण्यात आले. सामाजिक न्याय विभागांतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रही देण्यात आले.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी बँकांच्या कर्ज पुरवठाविषयक योजनांची, तर आशा रावण यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची आणि स्वच्छता निरीक्षक सुनील सोळंकी यांनी आयुष्मान कार्ड, पीपीटी किट यांची माहिती दिली. ओमप्रकाश कांबळे व अनिल पवार या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले. सचिन पाटील यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे समन्वय अधिकारी आशितोष कोठारी व अरुण काळेबाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अमर कांबळे, समाजकल्याण विभागाचे सदानंद बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.