कोल्हापूर : प्रवीण मस्के
‘पोस्टाच्या तिकिटांच्या (स्टॅम्प) संग्रहाचा कॅटलॉग करून वर्षाला सहा हजार शिष्यवृत्ती मिळवा...’ अशी अनोखी दीनदयाल स्पर्श योजना सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टाने सुरू केली आहे. ई-मेल, व्हॉटस्अॅप, फेसबुक व ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या जमान्यातही विद्यार्थ्यांना तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद यामुळे जडणार आहे.
टपाल सेवा ही सामजिक, आर्थिक जीवनाचा अभिन्न भाग आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात पोस्ट सेवेने वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्टाच्या वतीने विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती तसेच छंद जोपासण्यास चालना मिळावी, यासाठी दीनदयाल स्पर्श योजना राबवली जात आहे. 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी टपाल तिकीट संग्रह खाते योजना (फिलॅटेली डिपॉझिट योजना) सुरू केली आहे. फिलॅटेली एक छंद म्हणून जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक सर्कलमधून जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांना याप्रमाणे 6 वी ते 9 वी च्या प्रत्येक इयत्तेतील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. दरमहा पाचशे रुपयांप्रमाणे एक वर्षासाठी सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सर्कल स्तरावर स्थापन केलेल्या समितीमधील टपाल पदाधिकारी, प्रसिद्ध फिलॅटेसिस्ट ज्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा वर्षातून एकदा देशपातळीवर एकाच दिवशी घेण्यात येते. 29 सप्टेंबर 2024 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. ज्या विषयावर प्रकल्प कार्य करायचे आहे, त्या विषयाची सूची सर्कल ऑफिसकडून जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा व त्यास वार्षिक परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुण असणे गरजेचे आहे. त्या शाळेचा फिलॅटेली क्लब असणे महत्त्वाचे असून तो विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असावा. शाळेचा फिलॅटेली क्लब नसेल, तर त्या विद्यार्थ्याचे स्वतंत्र टपाल तिकीट संग्रह खाते असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड फिलॅटेली प्रोजेक्ट कार्यावरील मूल्यांकन किंवा सर्कल ऑफिसकडून घेतल्या जाणार्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील कामगिरीवरून केली जाणार आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड अर्जासमवेत जोडणे गरजेचे आहे. फिलॅटेली डिपॉझिट खात्यामधील सदस्य असल्याचा तपशील अर्जात द्यावा लागणार आहे. पूर्ण भरलेला अर्ज, सोबत पोस्ट स्टॅम्पचा केलेला प्रोजेक्ट पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ अधीक्षक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
पोस्टाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत 2024 मध्ये जिल्ह्यातील पाच शाळांमधील 406 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पैकी पाच विद्यार्थी टपाल तिकीट प्रकल्पासाठी पात्र झाले आहेत. 5 पैकी 4 विद्यार्थी दीनदयाल स्पर्श योजना शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांनी योजनेत सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.- अनुराग निखारे, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग