Kolhapur Cold Wave | कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढला; पारा १५.८ अंशांवर घसरला pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur Cold Wave | कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढला; पारा १५.८ अंशांवर घसरला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात यंदाच्या थंडीच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी झाली. दैनंदिन सरासरी किमान तापमानात २.३ अंशांची घट होऊन पारा १५.८ अंशांवर घसरला आहे. यामुळे सायंकाळनंतर हवेत कमालीचा गारवा निर्माण होत असून रात्री व पहाटे थंडीची अक्षरशः हुडहुडी जाणवत आहे. वाऱ्यांच्या प्रवाहाची दिशा बदलून पूर्व ईशान्येकडील वारे वाहत असल्याने शुक्रवार आणि शनिवारी (दि. २१) पहाटे किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरात थंडीची चाहूल सुरू झाली आहे. सात दिवसांपासून तापमान १७ अंशांच्या घरात कायम आहे. यामुळे रात्री तसेच पहाटे थंडी जाणवत होती. मात्र, गुरुवारी संध्याकाळपासून थंडीची तीव्रता वाढली. शुक्रवारी पहाटे थंडीचा चांगलाच कडाका जाणवत होता. शहरात धुक्याची दुलई देखील पसरली होती. सायंकाळनंतर देखील हवेत गारवा कायम होता. रात्री थंडीची तीव्रता वाढली होती.

थंडी वाढल्याने शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. रात्री व पहाटे घराबाहेर पडताना नागरिक स्वेटर, कानटोपी, जॅकेट घालून फिरताना दिसत आहेत. थंडीची हुडहुडी कायम असल्याने स्वेटर व उबदार कपडे खरेदी करण्यासाठी दसरा चौक परिसरात गर्दी होताना दिसत आहे.

चक्रीवादळामुळे वातावरणातील वाऱ्यांच्या प्रवाहाची दिशा बदलून पूर्व ईशान्येकडील वारे वाहू शकतात. या वाऱ्यांमुळे मध्य प्रदेशातील थंड हवेचा प्रवाह मध्य महाराष्ट्राच्या दिशेने येईल. परिणामी शनिवारी किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. हा थंडीचा प्रभाव तात्पुरता असून २३ नोव्हेंबरपासून दक्षिणेकडील ऊबदार वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने किमान तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
अथ्रेय शेट्टी, हवामान तज्ज्ञ, मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT