Gokul Election |  pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Election | गोकुळसाठी मुख्‍यमंत्री घेणार महायुतीच्या नेत्‍यांची बैठक

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्‍हापूर : गोकुळ सत्ताकारणावरून जिल्‍ह्यातील महायुती नेत्‍यांमध्‍ये निर्माण झालेला वाद आता मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या कोर्टातच मिटणार आहे. गोकुळ निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्री महायुती नेत्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीमध्‍ये निवडणुकीची दिशा ठरणार आहे. मंगळवारपासून (दि. १५) सुरू होणारी उमेदवारी अर्ज भरण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर कोणत्‍याही क्षणी मुंबईहून जिल्‍ह्यातील महायुतीच्‍या नेत्‍यांना बोलावणे येण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सप्‍टेंबरअखेरपर्यंत गोकुळ निवडणुकीचे चित्र स्‍पष्‍ट होणार आहे.

गोकुळचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्‍याने आता खर्‍या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती म्‍हणून गोकुळची निवडणूक एकत्रच लढणार, असा सूर नेत्‍यांचा असला, तरी अंतर्गत डावपेच सुरूच आहेत. नुकत्याच १४०० दूध संस्‍थांनी अदृश्‍य शक्‍तीबाबत दिलेल्‍या इशार्‍यामधून हे स्‍पष्‍टच होते. गेली सहा महिने दूध संस्‍थांच्‍या पात्र-अपात्रतेवरून सुरू असलेल्‍या राजकारणातून महायुती नेत्‍यांमध्‍ये नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी आता स्‍थानिक पातळीवर मिटणारी नसून ती मुख्‍यमंत्र्यांच्‍या कोर्टातच दूर होऊ शकते.

'बिनविरोध'चा मद्दा पुन्‍हा चर्चेत

गोकुळच्‍या माजी संचालिका शौमिका महाडिक यांनी जिल्‍हा बँकेप्रमाणे गोकुळची निवडणूकही बिनविरोध करा, असे सूचक वक्‍तव्‍य शुक्रवारी केले. महाडिक यांनी केलेल्‍या या वक्‍तव्‍यामुळे गोकुळ निवडणुकीच्या बिनविरोधचा मद्दा पुन्‍हा चर्चेत आला आहे.

काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी निवडणूक कोणत्‍याही परिस्‍थितीत लढणार, अशी भूमिका जाहीर केली असली, तरी दुसरीकडे त्‍यांनी बिनविरोधसाठीचा कोणताही प्रस्‍ताव आलेला नाही, असेही वक्‍तव्‍य यापूर्वी केले आहे. त्‍यामुळे मुंबईतील बैठकीनंतर गोकुळ बिनविरोध होणार का महायुती विरुद्ध आ. सतेज पाटील यांची समविचारी आघाडी अशी निवड‍णूक होणार, याचे चित्र स्‍पष्‍ट होणार आहे.

नेत्‍यांसह दूध संस्‍थांची नाराजी दूर होणार?

१४०० दूध संस्‍था प्रतिनिधींनी अदृश्‍य शक्‍तीला सोबत घेतले, तर आम्‍ही तुमच्‍या सोबत नाही, असा थेट इशारा नेत्‍यांनाच दिला आहे. ‍यामुळे स्‍थानिक पातळीवर संस्‍था प्रतिनिधींचा रोष पाहता त्‍यांची नाराजी दूर करण्‍याचे आव्‍हान नेत्‍यांसमोर असणार आहे.

नऊ टेबलवर स्‍वीकारले जाणार उमेदवारी अर्ज

कोल्‍हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे करण्‍यात आलेल्‍या निवडणूक कार्यालयाचे काम शनिवारी पूर्ण झाले. कार्यालयात ९ टेबलवर उमेदवारी अर्ज स्‍वीकारले जाणार आहेत. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याच्‍या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज स्‍वीकारण्‍यासाठी ९ टेबलपैकी पाच टेबल सर्वसाधारण गटासाठी असणार आहेत. उर्वरित चार प्रवर्गांसाठी प्रत्‍येकी एक अशी चार टेबल असणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, दोन सहायक निवडणूक अधिकारी असे एकूण ३५ अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त केले आहेत.

अर्जासाठी शंभर रुपये शुल्‍क

उमेदवारी अर्ज विक्रीसाठी येथे स्‍वतंत्र टेबल असणार आहे. एका अर्जासाठी शंभर रुपये शुल्‍क आकारले जाणार आहे. सुमारे ५०० पानांची मतदार यादीही येथे उपलब्‍ध असणार आहे. यादीसाठी १ हजार रुपये शुल्‍क असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT