कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळवर 25 ते 30 वर्षे सत्ता होती. काँग्रेसच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमत्र्यांनी कधीही गोकुळमध्ये हस्तक्षेप केला नाही; परंतु आता महायुतीचे जिल्ह्यातील नेते कमकुवत आहेत म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागत आहे, असा टोला काँगे्रसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
गळ्यात गळे घालायचे होते, तर गोकुळला का बदनाम केले?
आ. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा बालेकिल्ला आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षांत सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षविरहीत लढल्यानेच संस्था टिकल्या. पक्षाचे लेबल घेऊन आम्ही कधीही गोकुळ आणि जिल्हा बँकेची पायरी चढली नाही. महायुती सरकारच्या कालावधीत राजकारण सुरू झाले. युती करून गळ्यात गळे घालायचेच होते, तर तीन महिने गोकुळ बदनाम का केला? साडेपाच लाख शेतकर्यांशी निगडीत संस्था असल्याने शेतकर्यांच्या हिताचा विचार व्हावा, ही माझी भूमिका आहे. शेतकर्यांना 14 रुपये दरवाढ दिली आहे. त्यांची महायुती असली, तरी शेतकरी माझ्या बाजूने आहेत.
मुश्रीफांचा मुख्यमंत्र्यांना 22 वेळा फोन
गोकुळवर प्रशासक नियुक्त करू नये म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना तब्बल 22 वेळा फोन केला. फडणवीस यांनी त्यांचे ऐकले का नाही, हे माहीत नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा प्रशासकसंदर्भात वेगळा प्रस्ताव होता; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ऐकले नाही. गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असून आमच्या पॅनेलचे 25 उमेदवार असतील, असेही आ. पाटील म्हणाले.