कोल्हापूर : मुंबईत मंगळवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौर्यावर रवाना होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना अद्याप मुख्यमंत्र्यांची वेळ मिळालेली नाही. परिणामी गोकुळच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील महायुती नेत्यांची होणारी बैठक लांबणीवर पडणार असून ही बैठक बुधवारी (दि. ३०) होण्याची शक्यता आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा प्राथमिक प्रस्ताव तयार झाला असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली. तसेच पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने प्रस्तावावर तोडगा निघेल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. गोकुळ निवडणुकीसाठी ठरावांची पडताळणी, जागावाटपावरून महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचे नेत्यांकडून दाखविले जात आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे.
जागावाटपावरून जिल्ह्यातील महायुती नेत्यांमध्ये अंतर्गत प्रचंड धुसफूस आहे. ठरावांच्या संख्येवरून एकमत होत नसल्याने रविवारची बैठक थांबविण्यात आली होती. त्यामुळे जागावाटपाचा निर्माण झालेला तिढा मुख्यमंत्री कशा पद्धतीने सोडवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.