मुंबई : येथे उपमुख्‍यमंत्री स्‍व. अजित पवार यांच्‍या जयंतीनिमित्त आयोजित ‘अजित स्मृती, अवीट स्मृती’ या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्‍थित होते. 
कोल्हापूर

kolhapur | मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘अजित स्मृती, अवीट स्मृती’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन

‘गोकुळ’चे माजी अध्‍यक्ष अरुण डोंगळे यांची संकल्‍पना

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘अजित स्मृती, अवीट स्मृती’ या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नरिमन पॉईंट येथील महिला विकास मंडळात झाले.

अजित पवार यांच्या पाच दशकांच्या सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक जीवनाचा प्रवास उलगडणारी ४०० हून अधिक दुर्मीळ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. विद्यार्थिदशेपासून जनतेचा नेता म्हणून केलेल्या कार्याची झलक या छायाचित्रांतून पाहायला मिळते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले आणि अजित पवार यांच्‍यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजीराव गर्जे, अशोकराव माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अरुण डोंगळे यांनी कोल्हापुरात ‘अजितदादा विचार मंच’ स्थापन करून शेतकरी, युवक व महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी अमृता डोंगळे, अभिषेक डोंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास मोठी उपस्थिती लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT