सुनील कदम
कोल्हापूर : ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे राज्यातील फळबागांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी, यंदा राज्यातील द्राक्ष, आंबा, काजू, डाळिंब, संत्री यासह सर्वच फळ पिकांचे उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत.
द्राक्षांवर भुरी, डाऊनी
नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर हे जिल्हे प्रामुख्याने द्राक्ष उत्पादक आहेत. ऑक्टोबर छाटणीनंतर बहुतांश बागांमध्ये द्राक्षे बहरत असतानाच ढगाळ हवामानामुळे द्राक्षांवर भुरी आणि डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
आंब्यावर करपा
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे प्रामुख्याने आंबा उत्पादक आहेत. ढगाळ हवामानामुळे आंब्यावर करपा आणि भुरीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. परिणामी नवीन पालवी आणि मोहोर गळताना दिसत आहे.
डाळिंबावर तेल्या!
राज्यात सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने डाळिंबाची लागवड झालेली दिसते. मात्र सध्या डाळींब बागांना तेल्या रोगाने ग्रासलेले दिसत आहे.
काजूवर मावा, भुरी!
प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत काजू पिकाखाली जवळपास तीन लाख एकर क्षेत्र आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे काजूला मावा आणि भुरीने ग्रासलेले दिसत आहे.
30 लाख एकर फळबागा!
राज्यात संत्री, पेरू, चिकू, सीताफळ, लिंंबू, चिंच, अंजीर, आवळा, कोकम, जांभूळ आदी फळ पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. राज्यातील एकूण फळ पिकाखालील क्षेत्र हे साधारणत: 30 लाख एकर आहे. ढगाळ हवामानामुळे सर्वच फळ पिकांना धोका निर्माण झाला असून त्यांच्या उत्पादनात किमान 10 ते 20 टक्के घट होण्याची भीती व्यक्त होेत आहे.
5 ते 10 हजार कोटींच्या नुकसानीची भीती
ढगाळ हवामानामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. दुसरीकडे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांना फवारणीसाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करावा लागणार आहे. त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजाही शेतकर्यांवर पडणार आहे. परिणामी, शेतकर्यांना पाच ते दहा हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.