मुरगूड/कोडोली : मुरगूड व परिसरासह कोडोली येथे बुधवारी दुपारी ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे कोडोलीत बाजारपेठेतील सात दुकानांत पाणी शिरले. मुरगुडात सखल भाग जलमय झाले. मंगळवारी मध्यरात्रीही दमदार पाऊस पडला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने कोडोलीच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे थेट पाणी बाजारपेठेत शिरल्याने उत्तम पाटील, प्रकाश काशीद, अमर लाडगावकर, बावडेकर, सुहास हिरवे, जहाँगीर मुल्ला, प्रकाश सागावकर यांच्या दुकानांतील साहित्य भिजलेे.
जाता जाता पावसाची दमदार हजेरी
यंदाचा पावसाळा प्रचंड लहरी ठरला असताना जाता जाता पावसाने दमदार खेळी केली. मंगळवार रात्री पासूनच शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी सायंकाळी अचानक नभ दाटून आले आणि शहरात धुवाँधार पावसाने हजेरी लावली होती. तासाभराच्या कोसळधारांनी शहर अक्षरशः जलमय झाले होते. सखल भागात पाणीच पाणी झाले होते. नागरिकांसह दूचाकीस्वारांची एकच तारांबळ उडाली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने तुफान बॅटिंग केली असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाचा हलका शिडकावा होत होता. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाल्याने साडेचार वाजताच काळोख झाला आणि धुवाँधार पावसाने हजेरी लावली. तासभर शहरात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने दमदार एन्ट्री केली. गेल्या २४ तासांत सर्वाधिक २२.१ मि.मी. पाऊस हातकणंगले तालुक्यात झाला. त्यानंतर कागल १९.१, करवीर १८.८, राधानगरी १६.७, चंदगड १५.९, भुदरगड ९.७, शिरोळ ९.५, पन्हाळा ९.१, गगनबावडा ७.७, गडहिंग्लज २.८, आजरा येथे २.७ मि.मी. पाऊस झाला. धरण क्षेत्रातही पावसाने हजेरी लावली असून तुळशी, कासारी धरण क्षेत्रात मध्यम सरी बरसल्या. राधानगरी, वारणा, दूधगंगा, कडवी, कुंभी, पाटगाव धरण क्षेत्रात हलका पाऊस झाला.
पावसाने पिंजार गल्ली जलमय
कसबा बावडा : परिसरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले असतानाच पिंजार गल्लीतील नव्याने केलेल्या गटारीच्या कामाची अक्षरशः पोलखोल झाली. गटारीचे पाणी घरांसह दुकानांमध्ये घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
जयंती नाला ओव्हर फ्लो
शहरात सर्वदूर झालेल्या पावसामुळे जयंती नाला ओसंडून वाहत होता. पावसामुळे शहरातील शिवाजी पार्क येथील विक्रांत हौसिंग सोसायटी परिसरात झाड कोसळे होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी हे झाड बाजूला केले. बापट कॅम्प परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.