कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अंतिम विशेष फेरी 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
यंदा पहिल्यांदाच राज्यस्तरावर अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 280 महाविद्यालयांतील 66 हजार 10 जागांसाठी राज्यस्तरीय अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाकडून पुन्हा प्रवेश प्रक्रियेस वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यानुसार विशेष अंतिम फेरी घेण्यात येत आहे.
दि. 22 व 23 सप्टेंबर या कालावधीत नवीन कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी, अर्ज भाग- 1 मध्ये दुरुस्ती करणे, अर्ज भाग-2 भरणे व पसंतीक्रम देता येणार आहे. 24 व 25 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिली.