कोल्हापूर/शिरोली पुलाची : हालोंडी (ता. हातकणंगले) येथे वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. ही घटना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गट नंबर 638 मध्ये घडली. यात चौघेजण जखमी झाले. अमोल पाटील, अनिकेत पाटील, संदीप पाटील, तन्मय पाटील, अशी जखमींची नावे आहेत. यावेळी संतोष पाटील यांची साडेतीन तोळ्यांची चेन गहाळ झाली.
याप्रकरणी दोन्ही गटांतील धनपाल भाऊ पाटील, राजकुमार बाळगोंड पाटील, नंदकुमार शिवगोंड पाटील, अमोल गुंडा पाटील, गुंडा शिवगोंडा पाटील, संतोष गुंडा पाटील यांच्यासह 28 जणांवर शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
हालोंडी येथे गट नंबर 638 या वहिवाटीच्या रस्त्याचा न्यायालयात वाद सुरू आहे. या रस्त्यावर पाणी सोडून वाहतुकीस अडथळा केल्यावरून वाद उफाळून आला. या रस्त्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी व न्यायालयात वाद सुरू आहे. तरीही या रस्त्यावर पाणी सोडून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. हाणामारीवेळी शेती मशागतीच्या अवजारांचा वापर करण्यात आला.
अमोल पाटील याच्यासह 12, तर विरोधी धनपाल पाटील गटाचे 16 अशा दोन्ही गटांच्या 28 जणांवर गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून स्वतः तहसीलदार यांनी वहिवाटीच्या रस्त्याला भेट देऊन निर्णय दिलेला आहे. तरीही हा वाद धुमसत होता. पोलिसांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून 28 लोकांना नोटीस जारी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.