Kolhapur municipal corporation Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation | स्थायी समिती सभेत तुफान राडा

नगरसेवक आदिल फरास - प्रवीण सोनवणे भिडले; मनपाचा पुन्हा आखाडा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेतील नगरसेवकांतील राड्याचा प्रकार होऊन अवघा महिनाही उलटला नाही तोच स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक आदिल फरास आणि काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण सोनवणे यांच्यात शुक्रवारी सायंकाळी तुफान राडा झाला. महिला नगरसेविकांसमोरच अस्सल कोल्हापुरी शिव्या हासडत एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

‘आदिल, तू काय आता दारूच प्यायला जाणार की?’... ‘प्रवीण, तुझी दारूची दुकाने बंद करायला पाहिजेत...!’ अशा शब्दांत दोघांनीही एकमेकांना सुनावले. यावरून सुमारे 25 मिनिटे सुरू असलेल्या या राड्याने महिला नगरसेविकांसह अधिकारी-कर्मचारीही अवाक् झाले. गेले काही दिवस सत्ताधारी महायुती आणि विरोधी काँग्रेस यांच्यातील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी तर या वादाने हमरीतुमरीचे रूप घेतले. अधिकारी आणि इतर नगरसेवक नसते तर दोघांत चांगलीच हाणामारी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

महापालिकेत शुक्रवारी (दि. 24) सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. 4.30 च्या सुमारास सभा सुरू झाली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर प्रश्नोत्तरे सुरू झाली. सायंकाळी 7.30 वाजले तरी सभा सुरूच होती. परंतु, नगरसेविकांना घरी वेळेत जाणे गरजेचे असल्याने सभापती शिराळे यांनी सभा संपविण्याचे आदेश दिले. उशीर झाला असल्याने महिला नगरसेविका उठल्या.

प्रवीण सोनवणे यांनी सभा संपताना माझा एक प्रश्न आहे म्हणून माईकवर बोलायला सुरुवात केली. त्याचवेळी आदिल फरास यांनी सभा संपली... महिला नगरसेविका आहेत... आणखी किती वेळ सभा चालवणार, पुढच्या सभेला तुमचा प्रश्न घेऊ, चला उठा... असे म्हणून सर्व नगरसेवकांना उठविले. त्यावेळी संतापलेल्या सोनवणे यांनी ‘आदिल... तू काय आता दारूच प्यायला जाणार की!’ असे उद्गार काढले. त्यावर चिडलेल्या फरास यांनी ‘प्रवीण, तुझी दारूची दुकाने आहेत, त्यात बनावट दारूची विक्री होते, त्याची चौकशी करून तुझी दारूची दुकाने बंद करायला पाहिजेत’, असे सुनावले. तसेच असंविधानिक शब्द असल्याने सोनवणे यांनी शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी केली. सोनवणे यांनी, होय, मी म्हटलो, काय करणार ते कर जा, असे सुनावले.

फरास व सोनवणे हे एकमेकांना आव्हान देत अंगावर धावून गेले. बघून घेण्याची भाषा करू लागले. दोघांच्या आव्हानाची भाषा महापालिका चौकापर्यंत ऐकू येत होती. अधिकार्‍यांनी नगरसेविकांना सभागृहातून बाहेर काढले. दोघांत हमरीतुमरी होऊ लागल्याने सभापती शिराळे, अतिरिक्त आयुक्त आडसूळ, नगरसेवक अभिजित मोकाशी, अमर समर्थ, मुख्य अग्निशमन दल अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह इतर नगरसेवकांनी दोघांना अडविले. त्यांना अडविताना सर्वांना नाकीनऊ आले. अखेर एकेक करून दोघांना बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT