Navratri Mandal Workers Clash | नवरात्रौत्सव मंडळाच्‍या कार्यकर्त्यांत झटापट; रिव्हॉल्‍व्‍हरमधून सुटली गोळी  
कोल्हापूर

Navratri Mandal Workers Clash | नवरात्रौत्सव मंडळाच्‍या कार्यकर्त्यांत झटापट; रिव्हॉल्‍व्‍हरमधून सुटली गोळी

शाहूनगर येथील घटनेने खळबळ; मानापमानावरून वाद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या मानापमानावरून झालेल्या झटापटीत रिव्हॉल्‍व्‍हरमधून गोळी जमिनीच्या दिशेने सुटल्‍याने खळबळ माजली. याप्रकरणी विजयकुमार शंकरराव पाटील (वय ५९, रा. प्रतिभानगर, सध्या रा. न्यू पॅलेस परिसर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून याबाबत सुधीर दत्तात्रय खेबुडे (३६, रा. शाहूनगर) याने फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री शाहूनगर येथे घडली.

शाहूनगर येथील दत्त गल्लीमध्ये राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलच्या वतीने नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मंडळाचा अध्यक्ष विजयकुमार पाटील आहे. सायंकाळच्या आरतीला कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना बोलावले जाते. मात्र, सुधीर खेबुडेसह काही कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण न दिल्याने वाद धुमसत होता. हा वाद मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री कार्यकर्ते एकत्र जमले. यावेळी खेबुडे याने सिद्धेश थोरवतला ‘आमच्या कुटुंबीयांना आरतीला का बोलावले नाही,’ अशी विचारणा केली. यावरून वाद झाल्याची माहिती अध्यक्ष पाटील याला मिळाली.

खेबुडेसह काही कार्यकर्ते बाजूला जाऊन थांबले असता आपल्याबद्दल बोलल्याचा गैरसमज करून घेत विजयकुमारने कमरेची रिव्हॉल्‍व्‍हर बाहेर काढली. त्‍याला अडविण्यासाठी काही कार्यकर्ते धावत आले. यावेळी झटापटीत पाटील याच्या हातातील रिव्हॉल्‍व्‍हरमधून एक राऊंड फायर झाला. मोठा आवाज झाल्याने एकच धावपळ उडाली. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. पोलिसांनी संशयित विजयकुमार पाटील याला अटक केली असून रिव्हॉल्‍व्‍हर जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

प्रकरण आपापसांत मिटवण्याचा प्रयत्न

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्‍या या घटनेनंतर मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपापसांत मिटवण्याचा प्रयत्न केला. राजारामपुरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करून थेट गुन्हा दाखल करून कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT