कोल्हापूर : राजारामपुरीत सोमवारी सायंकाळी विविध मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुका भक्तिमय वातावरणात निघाल्या. लेसरचा झगमगाट, डीजेच्या दणदणाटात लाडक्या गणरायाचे तरुण, आबालवृद्धांनी जल्लोषात स्वागत केले.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Ganesh Festival | बाप्पांच्या आगमनाने शहर भक्तिमय; लेसरचा झगमगाट, डीजेचा दणदणाट

राजारामपुरीसह शहर परिसरात उशिरापर्यंत मिरवणुकांचा उत्साह

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ऽऽच्या जयघोषात विविध मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका भक्तिमय वातावरणात निघाल्या. लाईट इफेक्ट, हाय बीम लेसरचा झगमगाट, डीजेच्या दणदणाटावर तरुणाई थिरकली. उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत गणरायाच्या आगमनाने शहर भक्तिमय झाले होते.

राजारामपुरी जनता बझार चौकातून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्‌घाटन झाले. यावेळी गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली. ५३ पैकी ४१ गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. अनेक मंडळांच्या फुलांची आकर्षक सजावट केलेल्या गणेशमूर्ती सोने-चांदीच्या आभूषणांनी सजल्या होत्या.

पारंपरिक वाद्याला फाटा; सामाजिक संदेशही नाही

गतवर्षी विविध मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे साकारून मिरवणुकीची शोभा वाढवली जाते. काही ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला. परंतु, यंदाच्या गणशोत्सव आगमन मिरवणुकीत यातील काहीच पाहायला मिळाले नाही. पारंपरिक वाद्यालाही फाटा दिल्याने भक्तांची निराशी झाली.

अर्जुनवाडमध्ये साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा

जयसिंगपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना आणि मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे धडक कारवाई करत साऊंड सिस्टीमसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी उमेश संभाजी खोत (२९, रा. अर्जुनवाड), मुकुंद धनंजय मिरजकर (२८), ऋषिकेश श्रीकांत माळी (२३, दोघे रा. कवलापूर, ता. मिरज) व कृष्णा सुधाकर यादव पाटील (३४, रा. सांगलीवाडी, ता. मिरज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली.

अर्जुनवाड येथील खोत गल्लीत नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे साऊंड सिस्टीम लावली होती. तसेच वाहनात बेकायदेशीर बदल करून ही सिस्टीम बसवण्यात आली होती. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी २० लाख रुपये किमतीचे २ बेस, २ टॉप, ॲम्प्लिफायर, मिक्सर आणि १२५ केव्हीचे जनरेटर, तसेच साऊंड सिस्टीमसाठी वापरलेले ३ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक विलास निकम यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT