कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन व फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरूच ठेवावी, तसेच धुळीच्या रस्त्यांवर पाणी मारावे, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने गुरुवारी (दि. 11) दिले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान, कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या रस्ते कामाचा पूर्तता अहवालही महापालिकेच्या वतीने अॅड. अभिजित आडगुळे यांनी न्यायालयात सादर केला.
याचिकाकर्त्यांना दोन आठवडे मुदत
कोल्हापूर शहरातील रस्त्यांविषयी उदय नारकर यांच्यासह इतरांनी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. 4 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेला रस्ते कामाचा पूर्तता अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. तो आज सादर करण्यात आला. याचिकाकर्त्यांनी त्यावर आक्षेप नोंदविल्यानंतर दोन आठवड्यांत लेखी म्हणणे सादर करण्याचा आदेश त्यांना देण्यात आला.
पुढील सुनावणी 8 जानेवारीला
शहरात किती रस्ते मंजूर झाले आहेत, प्रत्यक्ष किती रस्त्यांची कामे सुरू आहेत, किती टक्के कामे पूर्ण झाले आहे, उर्वरीत कामे कधीपर्यंत पूर्ण होतील, तसेच रस्त्यांचे ऑडिट करण्यासाठी कोणत्या एजन्सी नेमल्या आहेत, त्याबरोबरच अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाईची माहिती अॅड. आडगुळे यांनी दिली. पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.