कोल्हापूर : हिवाळी पर्यटनाचा हंगाम आणि नाताळची सुट्टी कोल्हापूरच्या पर्यटनासाठी ‘लाख’मोलाची ठरली. 25 डिसेंबरपासून 4 जानेवारीअखेर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन 16 लाख भाविकांनी घेतल्याची नोंद झाली. तर कोल्हापूर डेस्टिनेशनची निवड केलेल्या राज्यातील विविध शहरांतील पर्यटकांच्या गर्दीने शहरातील पर्यटनस्थळे गजबजून गेली. सहकुटुंब, मित्रपरिवारासमवेत तसेच शालेय व महाविद्यालयीन सहलींमधून आलेल्या पर्यटकांमुळे कोल्हापुरातील बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली.
गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. दिवाळीनंतर हिवाळी पर्यटनाचा हंगाम सुरू होताच कोल्हापुरात दर वीकेंडला सरासरी एक लाख पर्यटक हजेरी लावत होते. पर्यटनासाठी पोषक हवामान तसेच निसर्गरम्य, ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांचे वैविध्य असल्याने महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यंदाही नाताळची सुट्टी सुरू झाल्यापासूनच कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी सुरू झाली होती. नाताळच्या शालेय सुट्ट्या 20 डिसेंबरपासून सुरू झाल्या होत्या, तर 4 जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी होती. नोकरदारांनी वर्षअखेरीच्या रजांचे नियोजन केले होते. तसेच डिसेंबर महिन्यात प्रामुख्याने शालेय परीक्षा नसल्याने सहलींचे आयोजन केले जाते.