हातकणंगले : चोकाक येथील नव्याने काम सुरू असलेल्या पुलाखाली अतिग्रे येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सचिन सर्जेराव मुसळे ऊर्फ लालू (वय 34, रा. अतिग्रे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा खून कोणत्या कारणातून झाला हे समजू शकले नाही.
चोकाक हद्दीत नव्याने सुरू असलेल्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सचिन मुसळे हा गंभीर जखमी अवस्थेत काही परप्रांतीय कामगारांना आढळून आला. याची माहिती या कामगारांनी हातकणंगले पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सचिन हा गंभीर जखमी असल्याने तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले; मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
सचिन हा नेहमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांच्या सोबत वावरत होता. तो व्यसनाधीन असल्याने कोणतेही काम करत नव्हता. घटनास्थळी दारूची बाटली आढळल्याचे समजते. उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मारेकर्यांचा शोध सुरू केला आहे. सचिनच्या मागे आई, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.
नव्याने बांधण्यात आलेला चोकाक येथील पूल हा व्यसनी लोकांचा अड्डा बनला आहे. येथे दररोज अनेकजण दारू, गांजा व अमली पदार्थ सेवनासाठी येत असल्याचे समजते. या ठिकाणी व्यसनाधीन तरुणांचा मोठा वावर असतो; मात्र याकडे अनेक नागरिक कानाडोळा करून जात असतात. या व्यसनाधीनांकडून अनेक लोकांना नाहक त्रासही दिला जातो; मात्र याकडे सर्वजण दुर्लक्ष करत होते. आज हा गंभीर प्रकारही या दुर्लक्षाच्या भावनेतूनच घडल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांतून सुरू होती.