मुरगूड : चिमगाव (ता. कागल) येथे मोटारसायकल कर्कश आवाजात फिरवल्याबद्दल विचारणा केल्याच्या कारणातून अजिंक्य भरत एकल (वय 33) याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. जखमीस कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मारहाणप्रकरणी बाप व मुलग्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
चिमगाव येथे स्वप्निल संजय करडे हा इतर दोन मित्रांसोबत गावातून मोटारसायकल आवाज करून फिरवत होता. त्याबाबत अजिंक्य एकल याने अमोल प्रकाश एकल यास सांगितल्याचा राग मनात धरून संजय करडे याने अजिंक्यला फोन करून बोलवून घेतले व तू माझ्या मुलाचे नाव सगळ्यांना का सांगितलेस असे म्हणून शिवीगाळ करीत तुला आता सोडणार नाही, असे म्हणत अजिंक्यला चाकूने भोसकले त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूस गंभीर जखम झाली आहे. या प्रकरणी जखमी अजिंक्यचा भाऊ रणजित एकल यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय करडे व त्यांचा मुलगा स्वप्निल करडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.