एकनाथ नाईक
कोल्हापूर : कोल्हापूरभोवती कुपोषणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. जिल्ह्यातील सधन आणि सुद़ृढ तालुका म्हणून ओळख असणार्या करवीर तालुक्यात 10 पैकी एका बालकाला कुपोषणाने मगरमिठ्ठी मारली आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील बालकांच्या कुपोषणाचे चित्र धक्कादायक आहे. वयानुसार बालकांचे वर्गीकरण केले तर जिल्ह्यातील 4 हजार 350 बालके कमी वजनाची, उंचीनुसार 1 हजार 98 अंगणवाड्यांतील बालके कमी वजनाची आहेत. प्रशासनाकडून 15 ऑगस्टपर्यंत जिल्हा कुपोषित करण्याच्या गप्पा हाणल्या जात असताना कोल्हापूरसारख्या समृद्ध जिल्ह्यातील कुपोषित बालकांची ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.
ग्रामबाल विकास केंद्राअंगतर्गत अतितीव्र बालकांना शासनातर्फे तर मध्यम कुपोषित बालकांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांच्या मदतीने पोषण आहारचे किट दिले जात आहे. जिल्ह्यात हृदय रोग, कॅन्सर यांसारख्या दुर्धर आजारांनी 117 बालके त्रस्त आहेत. कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. यासाठी वजनाच्या वर्गवारीनुसार कुपोषणाची स्थिती ठरवण्यात आली आहे. त्यामध्ये उंचीनुसार व वयानुसार असे दोन प्रकार आहेत. शून्य ते पाच वयोगटातील कुपोषित बालकांना सकस आहार दिला जात आहे. कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जाते.
ग्राम बाल विकास केंद्रामार्फत बालकांना खीर, गहू सत्व, केळी, डाळी, चिक्की विविध प्रकारचे ड्रायफूट दिले जात. मात्र हे केवळ अतितीव्र कुपोषित बालकांना दिले जाते कमी वजनाच्या किंवा मध्यम कुपोषित बालकांना हा आहार दिला जात नसल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे.
गरोदर महिलांनी शेवयांचा उपमा, खीर, शिरा, अळिवाचे लाडू, चिक्की, प्रक्रियायुक्त सोयाबीनचे दूध, कडधान्यांची भेळ, घरगुती शेंगदाणे खाण्यावर भर दिला पाहिजे. बालकांना सहा महिने केवळ स्तनपान द्यावे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.