कोल्हापूर : जवाहरनगरमधील सरनाईक वसाहत येथे पाण्याने भरलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात पडून पाच वर्षीय बालकाचा दुदैर्र्वी अंत झाला. इजान अक्रम बारगीर असे मृत बालकाचे नाव आहे. तीन तास बेपत्ता असलेल्या बालकाचा मृतदेह खड्ड्यात मिळून येताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या खड्ड्यावरून महापालिका आणि कंत्राटदार यांच्यात सुरू असलेला वाद मुलाच्या जीवावर बेतला.
खड्डा मुजविण्यासाठी आठ वर्षांपासून नागरिकांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत माहिती अशी, जवाहरनगर येथील सरनाईक वसाहत, पाचवी गल्ली येथे अक्रम बारगीर पत्नी, 9 वर्षांची मुलगी व 5 वर्षांचा इजान यांच्यासमवेत राहतात. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इजान घरामधून बाहेर पडला. बराच उशीर झाला तरी तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, तौसिफ पटवेगार, वसीम पटेल, मोहसीन मुल्ला यांनी येथील मस्जिदवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तर, इजानच्या घरच्यांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली. याचवेळी तौसिफ यांना मुलगा मिळाल्याची माहिती मिळाली, त्यामुळे त्यांनी शोधमोहिम थांबविली. पण साडेसह वाजण्याच्या सुमारास तौसीफ यांनी मुलगा न मिळाल्याचे इजान याच्या कुटुंबियांनी कळवले.
तौसीफ यांनी पुन्हा सीसीटिव्ही तपासले. यामध्ये मस्जिदपासून इजान पुढे गेलेला दिसला पण दूसर्या कॅमेर्यामध्ये त्यांना इजान तेथून पुढे किंवा पुन्हा परतलेला दिसला नाही. त्यामुळे तौसीफ व इतरांनी येथून काही अंतरावर असलेल्या खोल खड्ड्यात इजानचा शोध घेतला. खड्ड्यातील पाण्यावर असलेले हिरवे शेवाळ दूर केले असता इजानचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. घटनास्थळी पोलिसही आले. मृतदेह पाण्याबाहेर काढून सीपीआरमध्ये आणला. याठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथून शेंडापार्क येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
260 स्के.फूट रुंद, 40 फूट लांब खड्डा
येथील नागरिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार सुमारे सात ते आठ वर्षांपुर्वी येथे अपार्टमेंट बांधण्यासाठी हा खड्डा खोदला होता. पण येथून महापालिकेचा 40 फूट डीपी रोड असल्याने हे महापालिकेने हे काम थांबवले. तेंव्हापासून येथे 260 स्के. फूट रुंद व 40 फूट लांब आणि सुमारे वीस फूट खोल खड्डा तसाच आहे. या खड्डात पाणी असून त्यावर शेवाळ असल्याने प्रथमदर्शनी येथे पाण्याचा खड्डा असल्याचे समजून येत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक गेल्या आठ वर्षांपासून येथील खड्डा मुजविण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. निवेदन आणि महापालिकेसमोर उपोषण करुनही अद्याप ढिम्म महापालिका प्रशासनाने खड्डा मुजविलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सहाशे विद्याथ्यार्ंचा जीव धोक्यात
खड्डा असणार्या परिसरातच उर्दू शाळा आहे. या शाळेत सुमारे सहाशे विद्यर्थी शिक्षण घेत आहेत. या खड्ड्यपासूनच शाळेतील विद्यार्थ्यांची ये-जा सुरु असते. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका आहे. पाच वर्षीय इजानच्या मृत्यूनंतर तरी हा खड्डा मुजविण्यासाठी महापालिका जागी होणार का, असा संतप्त प्रश्न येथील नागरिक करत आहेत.